पुणे : रस्त्यात खिळे टाकून चाक पक्चर करण्याच्या प्रकारानंतर आता टायरवर शांम्पू मिक्स पाणी टाकून येणाऱ्या बुडबुड्याच्या ठिकाणी हत्यार खुपसून तुमच्या डोळ्यादेखत नसलेले चाक पक्चर करुन डोळ्या देखत फसवणूक करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी खडकीपोलिसांनी दोघांना अटक केली आहे़
बंटी ऊर्फ आशुतोष रवींद्र येरल्लु (वय ३५, रा़ बोपोडी) आणि सुमित सुरेश पाल (वय २०, रा़ दापोडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी संकेत चंद्रकांत शिंदे यांनी फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले की, संकेत शिंदे हे कारने सोमवारी दुपारी एकच्या सुमारास मुंबई -पुणे रोडने जात होते. खडकी येथील जयहिंद टॉकीजजवळ आल्यावर बंटी येरल्लु याने त्यांना हाताने इशारा करुन थांबविले. त्यांच्या कारजवळ येऊन त्यांनी पुढच्या चाकात हवा कमी असल्याचे सांगितले आणि त्यांना पंक्चरच्या दुकानात नेले. त्यावेळी दुकानामध्ये असलेल्या सुमित पाल याने टायर चेक करण्यासाठी शॅम्पू मिसळलेले पाणी टायरवर ओतले. त्या पाण्याचे ज्या ज्या ठिकाणी बुडबुडे दिसत होते. तेथे त्याने हातातील टोकदार हत्यार खुपसून १८ पंक्चर असल्याचे सांगितले. त्या पंक्चर काढल्याचे दाखवून शिंदे यांच्याकडून अठराशे रुपये घेतले. त्यानंतर शिंदे हे थेट खडकी पोलीस ठाण्यात गेले व त्यांनी फिर्याद दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करुन पोलिसांनी दोघांना अटक केली. त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. आरोपीच्या वकिलाने हे केवळ नुकसान असून फसवणूकीचा प्रकार नसल्याचे सांगितले. त्यावर हा लोकांच्या फसवणूकीचाच प्रकार असल्याचे पोलिसांचे म्हणणे ग्राह्य धरुन अधिक तपासासाठी २१ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. खडकी येथे यापूर्वी रस्त्यावर खिळे टाकून लोकांच्या गाड्यांचे टायर पंक्चर करुन त्यांच्याकडून पैसे उकळण्याचे प्रकार होत होते. याप्रकरणी पोलिसांनी कारवाई केल्यानंतर आता या चोरट्यांनी नवा प्रकार सुरु केला आहे. याबाबत खडकी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोहिते यांनी सांगितले की, हे लोक फुटपाथवर बसतात. त्याच्या काही अंतरावर लोकांना चाकात हवा कमी असल्याचे सांगतात. त्यांच्यावर विश्वास ठेवून ते काही मीटर अंतरावर फुटपाथवर थांबलेल्या त्यांच्या साथीदाराकडे जातात. ते टायर काढून त्यात ट्युब टाकल्यावर शॅम्पूमुळे काही ठिकाणी बुडबुडे येतात. तेथे ते वाहनचालकाच्या समोर हातातील छोटे हत्यार खूपसून पंक्चर झाल्याचे दाखवितात. ती काढून देऊन त्यांच्याकडून प्रत्येक पंक्चरचे शंभर रुपये असे दुचाकीचालकाकडून ५०० ते ७०० रुपये उकळतात. पण, कोणीही तक्रार देण्यासाठी पुढे येत नाही़ पोलिसांना तक्रार मिळताच कारवाई केली असून त्यांच्याकडे तपास सुरु आहे.