\Sलोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शहरात ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात दिवाळीपर्यंत कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा आटोक्यात आला. पण दिवाळीनंतर त्यात वाढ होत असल्याचे मागील पाच दिवसांच्या ‘पॉझिटिव्हिटी रेट’वरून दिसून येत आहे. दि. १५ ते १९ नोव्हेंबर या पाच दिवसांत दररोज सरासरी २१९ रुग्ण पुण्यात आढळले आहेत. या पाच दिवसात दररोज केवळ १६५२ चाचण्या झाल्या आहेत. दि. १ ते १५ नोव्हेंबर दरम्यान दररोज सरासरी १९६५ चाचण्यांमागे २०२ रुग्ण आढळून आले.
नागरिक तपासणीसाठी येत नसल्याने चाचण्यांचे प्रमाण कमी झाल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात आहे. त्यामुळे रुग्णसंख्याही घटल्याचे चित्र होते. दिवाळी संपल्यानंतर गेल्या तीन दिवसांत रुग्णांमध्ये दिवसागणिक वाढ होऊ लागल्याचे स्पष्ट झाले आहे.
शहरात गुरूवारी ४११ तर बुधवारी ३८४ रुग्ण आढळून आले. कोरोनाची दुसरी लाट डिसेंबर किंवा जानेवारी महिन्यात येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दिवाळीपुर्वी खरेदीसाठी झालेली गर्दी, कौटुंबिक कार्यक्रमांमुळे वाढलेला प्रवास या प्रमुख कारणांमुळे कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणावर वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे गेल्या दोन दिवसांत वाढलेली रुग्णसंख्या चिंता वाढविणारी आहे. दि. १५ ते १९ नोव्हेंबर या पाच दिवसांत दररोज सरासरी १६५२ चाचण्या झाल्या असून सरासरी २१९ रुग्ण आढळून आले. या कालावधीतील पॉझिटिव्हिटी रेट १३.२५ होता.
दि. १ ते १५ नोव्हेंबर या कालावधीत दररोज १९६५ चाचण्यांमध्ये २०२ रुग्ण आढळले. हे प्रमाण १०.२८ टक्के एवढे होते. तर १९ नोव्हेंबरपर्यंत हा दर जवळपास ११ टक्क्यांवर पोहचला आहे. ऑक्टोबर महिन्यातील पॉझिटिव्हिटी रेट १४.३९ टक्के राहिला. मागील दोन-तीन दिवसांत चाचण्यांची संख्याही वाढू लागली असून त्या तुलनेत बाधितांचा आकडा अधिक असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. त्यामुळे एकूण पॉझिटिव्हिटी रेट असूनही २१ टक्क्यांच्या पुढेच आहे.
-------