पुणे : गृह विलगीकरणात (होम आयसोलेशन) असलेले कोरोनाबाधित अकारण घराबाहेर फिरत असल्याचे आढळून आले आहे. असा बेजबाबदारपणा करणारे कोरोनारुग्ण घराबाहेर आढळल्यास आता त्यांची रवानगी आता थेट महापालिकेच्या कोविड केअर सेंटर (सीसीसी) मध्ये केली जाणार आहे. त्यामुळे गृह विलगीकरणातील कोरोना रुग्णांनी स्वतःसह, इतरांची व महापालिकेची फसवणूक न करता घरीच विलग राहून कोरोना संसर्गास अटकाव करावा, असे आवाहन महापालिकेने केले आहे.
शहरात सध्या ३३ हजारांपेक्षा जास्त सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. यापैकी बहुतांशी रुग्ण हे गृह विलगीकरणात आहेत. यातील अनेक जण घरी न थांबता बाहेर, चौकात, बाजारपेठेत दिसत आहेत. या कोरोना रुग्णांमुळे इतर पुणेकरांना कोरोना संसर्ग होण्याचा धोका आहे. त्यामुळे महापालिकेच्या आरोग्य विभागाने सर्व क्षेत्रीय कार्यालयांना गृह विलगीकरणात असलेल्या कोरोना रुग्णांवर ‘वॉच’ ठेवण्यास सांगितले आहे. तसेच ‘वॉर रूम’मधून फोन केल्यानंतर जे रुग्ण फोन उचलत नाहीत, आरोग्याची माहिती नीट देत नाहीत, नियमांचे पालन करत नाहीत अशा रुग्णांना लागलीच त्यांच्या घरी जाऊन पालिकेच्या ‘सीसीसी’मध्ये दाखल करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
चौकट
भटका कोरोनारुग्ण दिसला की...
आपल्या आसपास कोणी कोरोनाबाधित असल्याची माहिती असेल व तो घराबाहेर फिरत असल्याचे लक्षात आले तर नागरिकांनीही लागलीच महापालिकेशी संपर्क साधावा, असे आवाहन आरोग्य विभागाने केेले आहे.
---------
चौकट
कोरोनाबाधितांनी स्वत: घेऊ नये निर्णय
कोरोनाबाधित असल्याचा अहवाल आल्यावर, लक्षणे नाहीत, काही त्रासही होत नाही. म्हणून बाधितांनी स्वतःहून गृह विलगीकरणाचा पर्याय स्वीकारू नये. महापालिकेच्या किंवा खासगी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, त्यांच्या सल्ल्यानेच निर्णय घ्यावा असे आवाहन महापालिकेने केले आहे.
चौकट
खोटे बोलाल तर...
कोरोनाबाधित असल्याचा अहवाल आल्यावर बहुतेकजण गृह विलगीकरणाचा पर्याय स्वीकारत आहेत. तसेच पालिकेला माहिती देताना अनेकजण स्वतंत्र राहण्याची व स्नान-शौचगृहाची व्यवस्था घरी असल्याची खोटी माहिती देत असल्याचे आढळून आले आहे. या पद्धतीने स्वतःची, पालिकेची फसवणूक केल्यास सर्वात आधी घरातील इतरांना कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे स्वतंत्र सोय असेल तरच घरी राहावे, असे महापालिकेचे सहायक आरोग्य अधिकारी डॉ. संजीव वावरे यांनी सांगितले.