पुणे : शहरात प्रथमच ‘जॅपनीज इन्सेफेलायटीस’ (जेई) अर्थात मेंदूज्वरचा रुग्ण आढळून आला आहे. ही बाधा झालेल्या वडगाव शेरी येथील ४ वर्षांच्या बालकावर दि. ३ नोव्हेंबरपासून ससून रुग्णालयात बालरोग विभागात उपचार सुरू आहेत. मंगळवारी त्याचा अहवाल एनआयव्हीमधून आला असून, ताे ‘जेई’ पाॅझिटिव्ह आहे. त्यानुसार आराेग्य विभागाकडून रुग्णाच्या परिसरातील ताप व डासांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे.
आराेग्य यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार, या बालकाला नाेव्हेंबरच्या सुरुवातीला ताप व डाेकेदुखी अशी लक्षणे हाेती. ताप वाढून त्याला तापेचा झटका आला. त्यात त्याचा एक हात व पायदेखील कमकुवत झाला. त्याला सुरुवातीला खासगी व नंतर ससून रुग्णालयात उपचारासाठी पाठवले. त्यानंतर हा बालक दहा दिवस रुग्णालयात उपचार घेत हाेता. त्यामध्ये थाेडी सुधारणा झाली असून, सध्या ताे ससूनमध्ये सर्वसाधारण वाॅर्डमध्ये उपचार घेत आहे.
काय आहे आजार ?
- ‘जेई’ हा एक प्रकारचा विषाणूजन्य मेंदूला होणारा संसर्ग आहे. त्याला मेंदूज्वर असेही म्हणतात.- यामध्ये रुग्णाच्या मेंदूला सूज येते. सोबत ताप, डोकेदुखीही असते. याचा प्रभाव १ ते १५ वर्षांच्या वयाेगटातील बालकांमध्ये जास्त आढळून येतो.- प्रामुख्याने विदर्भात याचे रुग्ण आढळून येत असतात. जिल्ह्यातही पाच वर्षांपूर्वी याचे रुग्ण आढळले हाेते. पुन्हा रुग्ण आढळल्याने आरोग्य यंत्रणेपुढील आव्हान वाढले आहे.
‘जेई’ विषाणूचे डुकरांमध्ये वास्तव्य
‘जेई’चे विषाणू हे बाधित डुकरांमध्ये मोठ्या प्रमाणात असतात; पण त्याचा त्यांना कोणताही त्रास होत नाही. म्हणून डुकरांना याचा वाहक (होस्ट) असे म्हणतात. जर या डुकरांना डास चावला व तो बालकाला चावल्यास त्याचा प्रसार होतो.
क्युलेक्स विष्णोयी डासांपासून प्रसार
‘क्युलेक्स विष्णोयी व क्युलेक्स ट्रायटनोरिन्क्स’ हे डास याचे प्रसारक आहेत. पाणथळ भागात या डासांची उत्पत्ती होत असते. तसेच झोपडपट्टी, जंगल, ग्रामीण भागातही हे डास आढळतात. तसेच डुकरांचा वावर असलेल्या ठिकाणी प्रसाराची शक्यता जास्त असते.
या उपाययोजना करा :
- रुग्ण राहत असलेल्या परिसरात कीटक शास्त्रीय सर्वेक्षण करून क्युलेक्स संवर्गातील डासांचे नमुने तपासणीसाठी एनआयव्हीला पाठवण्यात यावेत.- रुग्णाच्या आजूबाजूच्या परिसरातील डास उत्पत्ती स्थानांचा शोध घेऊन त्यांचा नायनाट करावा तसेच घरामध्ये व घराबाहेर धूरफवारणी करावी.- परिसरातील पाळीव प्राणी, डुकरे यांचे रक्तजल नमुने हे पशुवैद्यकीय अधिकारी यांचेमार्फत एनआयव्हीला पाठविण्यात यावेत.
''वडगाव शेरी भागात या डासांची उत्पत्तीस्थळे आहेत किंवा नाही, हे तपासण्याबराेबरच डास निर्मूलन करण्याचे निर्देश महापालिकेच्या आराेग्य विभाग व जिल्हा हिवताप अधिकाऱ्यांना दिले आहेत. रुग्णाच्या घरातील सदस्य व आजूबाजूच्या परिसरातील लहान मुलांचे रक्तजल नमुने संकलित करावे. ते ‘एनआयव्ही’कडे तपासणीसाठी पाठवण्यास सांगण्यात आले आहे. - डाॅ. बी.एस. कमलापूरकर, सहसंचालक, हिवताप, हत्तीरोग व जलजन्य राेग''
''आतापर्यंतच्या इतिहासात पुणे शहरात ‘जेई’चा हा पहिलाच रुग्ण आढळून आलेला आहे. याआधी पुण्यात आढळून आले ते जिल्ह्यातील हाेते. या रुग्णाचा अहवाल मंगळवारी सायंकाळी पाॅझिटिव्ह आल्याने त्या रुग्णाच्या परिसरातील रुग्णांचे ताप सर्वेक्षण करण्यात येत आहे. तसेच क्युलेक्स डासाचीही माहिती घेण्यात येत आहे. - डाॅ. संजीव वावरे, साथराेग अधिकारी, पुणे मनपा''
राज्यात गेल्या सहा वर्षांत आढळलेले ‘जेई’चे रुग्ण आणि मृत्यू
वर्ष रुग्णसंख्या मृत्यू२०१७ २९ ०२०१८ ६ १२०१९ ३५ १०२०२० २ १२०२१ २ ०२०२२ २ ०एकूण ७४ १२
ही आहेत लक्षणे :
- सुरुवातीच्या आठवड्यात हुडहुडी भरून ताप, डोकेदुखी व अंगदुखी ही लक्षणे दिसतात.- रुग्ण बेशुद्ध अवस्थेत जाऊ शकतो. या आजारात काही रुग्णांमध्ये मळमळ, डोकेदुखी, ताप, उलट्या व कधी कधी वृषणावर सूजही दिसून येते. या रोगामुळे मज्जासंस्थेचे विकार, भावनिक परिणाम व अपंगत्व इत्यादी परिणाम होऊ शकतात. या रोगामुळे प्रामुख्याने लहान मुलांचे मृत्यू २० टक्क्यांपर्यंत होतात.
निदान
या रोगाचे निदान प्रामुख्याने रुग्णांच्या रक्तजलातील ॲन्टीबॉडीज शोधून किंवा एलायझा पद्धतीद्वारे तसेच पाठीच्या मणक्यातील पाण्याच्या तपासणी (सीएसएफ) द्वारे करण्यात येते.
लक्षणांनुसार उपचार
या विषाणूचा माणसांमधील अधिशयन काळ (लागण झाल्यापासून लक्षणे दिसण्याचा) ५ ते १५ दिवसांचा आहे. जपानी मेंदूज्वरावर कोणताही विशिष्ट असा उपचार नाही. परंतु त्याची लस देता येते.
घाबरू नका, ही काळजी घ्या
- ताप जास्त असल्यास रुग्णांचे शरीर ओल्या फडक्याने पुसून काढावे.- मोठे आवाज अन् प्रखर प्रकाश टाळावा.- रुग्णास एका कडेवरच झोपवून ठेवावे.- रुग्णाच्या तोंडाची पोकळी व नाक स्वच्छ ठेवा.- रुग्णास मान वाकवू देऊ नये.