लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : नुकताच गणेशोत्सव शांततेत पार पडला. कोरोनाचे सावट हळूहळू का होईना, आता दूर होऊ लागले आहे. अशा परिस्थितीत येत्या काही दिवसांतच नवरात्र, पाठोपाठ दसरा अन् त्यानंतर दिवाळी सण येऊ घातला आहे. पूर्वी दुकानदार या सणांसाठी आपली दुकाने सज्ज ठेवण्यासाठी दुकानातील जुना माल काढून टाकण्यासाठी मान्सून सेल काढत असत. त्यातून जुन्या साड्या, एक अथवा दोनच रंगाच्या शिल्लक राहिलेल्या साड्या, ड्रेस मटेरियल, इतर कपड्यांची विक्री होत असे. त्यातून दुकानदाराचे भांडवल वसूल होऊन सणासाठी नवा माल भरायला दुकानदार मोकळे होत. आता मात्र, ऑनलाईनवर कोणतेही कारण नसतानाही अनेकदा ऑफरचा भडिमार होतो. येणाऱ्या सणाच्या काळात अशा फेस्टिव्हल ऑफर्सचा भडिमार होण्याची शकता आहे. त्यातून फसवणूक होण्याची शक्यता अधिक वाटत आहे.
कोरोनाचे संकट दूर होऊ लागल्याने आता बाजारपेठेत उत्साह पुन्हा परतू लागला आहे. गेल्या वर्षभरापासून वर्क फ्रॉम होम सुरू ठेवणाऱ्या आयटी कंपन्याही आता पुन्हा आपल्या कर्मचाऱ्यांना कार्यालयात बोलवू लागल्या आहेत. त्यामुळे बाजारात आता खरेदी जोमाने सुरू होण्याची शक्यता आहे.
आयटी तसेच माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील बहुसंख्य जण तसेच तरुण-तरुणी सध्या ऑनलाईन खरेदीवर भर देताना दिसत आहेत. त्यातून वेगवेगळ्या ऑफर्सच्या नावाखाली फसवणुकीची शक्यता आहे.
ऑनलाईन फ्रॉडमध्ये ७० टक्के फसवणूक आर्थिक
गेल्या काही वर्षांत ऑनलाईन व्यवहारात मोठी वाढ झाली आहे. त्याबरोबरच फसवणुकीच्या प्रमाणातही वाढ झाली आहे. ऑनलाईन फसवणुकीतील ७० टक्के फ्रॉड हे आर्थिक असतात. त्यामुळे प्रत्येकाने काळजी घेण्याची आवश्यकता आहे.
ही घ्या काळजी
* ऑनलाईन खरेदी करताना केवळ ऑफर आहे, म्हणून भुलू नका
* संबंधित कंपनी, दुकान हे प्रत्यक्ष आहे का याची खात्री करा.
* ऑर्डर करताना आपण जी ऑर्डर केली तोच माल येईल, याची खात्री करा
* ॲडव्हान्स पेमेंट ऐवजी कॅश ऑन डिलिव्हरी पर्याय निवडा. हा पर्याय नसेल तर ऑर्डर करण्याचा पुन्हा विचार करा. कदाचित तो सापळा असू शकतो.
........
कोणतीही ऑनलाईन खरेदी करताना कॅश ऑन डिलिव्हरी हा पर्याय निवडा. त्यातून तुम्ही ऑनलाईन ऑफर्सच्या नावाखाली होणाऱ्या फसवणुकीपासून बचाव करू शकाल.
डी. एस. हाके, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सायबर पोलीस ठाणे.