पुणे : नो एंट्री आणि चुकीच्या बाजूने येणाऱ्या वाहन चालकांवर पुणे वाहतूक पोलिसांनी चांगलाच कारवाईचा बडगा उगारला आहे. एक दोन नव्हे तर तब्बल ५०० जणांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. आता फक्त दंड न करता या बेशिस्त वाहन चालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, लांबचा मार्ग टाळण्यासाठी स्वतःच्या आणि इतरांच्या जीवाची पर्वा न करता अनेक चालक बेदरकारपणे नो एंट्रीतून वाहन नेतात. यामुळे अनेक अपघातही झाले आहेत. वाहतुकीच्या या नियमाचे सर्रास उल्लंघन केले जात होते. अखेर पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली असून यामुळे नो एंट्रीतून वाहन जाणे महागात पडणार आहे. गेल्या काही दिवसांमध्ये वाहतूक विभागाकडून तब्बल 500 जणांवर कारवाई करण्यात आलीय, अर्थात गुन्हा नोंद होऊन जामिनावर मुक्तता जरी होणार असली तरी पोलिसांनी नोंदवलेल्या गुन्ह्याचा उल्लेख थेट वाहनचालकाच्या चारित्र्य पडताळणीच्या अहवालात होणार आहे, तसेच नियमांचा भंग करणाऱ्यांच्या विरोधात न्यायालयात आरोपपत्र दाखल केले करणार आहे.
याबाबत वाहतूक पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, ' विरुद्ध बाजूने येणाऱ्या चालकांवर कारवाईची विशेष मोहीम वाहतूक शाखेने उघडली आहे. यामध्ये दोषी आढळलेल्या चालकावर रीतसर एफआयआर नोंदवण्यात येतो. यामुळे त्याचा क्रिमिनल रेकॉर्ड तयार होतो यामुळे संबंधित व्यक्तीला भविष्यात त्रास होऊ शकतो. हा जामीनपात्र गुन्हा आहे.