स्टार ११९९
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : राजस्थानमधील हाकम अब्दुल मजीद हे चालक कंटेनर घेऊन तमिळनाडूहून मुंबईला जात होते. कोंढवा-कात्रज रोडवर उंड्री येथे एका कारमधून तिघे जण आले. कंटेनरला कार आडवी घालून त्यांना थांबायला भाग पाडले. तुमच्यामुळे अपघतात झाला, पोलीस ठाण्यात चल असे म्हणून त्याला जबरदस्तीने कारमध्ये घेऊन वाटेत निर्जन जागी नेऊन लुबाडले.
काही दिवसांपूर्वी कोंढवा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. अपघाताची बतावणी करून तसेच वेगवेगळी कारणे सांगून लुटण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे रस्त्यावर कोणी विनाकारण वाद घालत असेल तर सावधान राहा. तुम्हाला लुटण्याचा त्यांचा हेतू असू शकतो.
शहरात विशेषत: आडबाजूला रात्री-अपरात्री असे प्रकार वाढू लागले आहेत. रस्त्याने कोणी जात असेल तर त्याला धक्का मारून जाणे. त्याने काही विचारले तर वाद निर्माण करून त्याला मारहाण करणे, जेणेकरून आजू बाजूच्यांना वाटेल की भांडणे सुरू आहेत, असे भासवणे. त्याचे साथीदार जवळ येऊन भांडणाचे कारण विचारण्याचा बहाणा करून त्याला लुटण्यात येते.
असे तुमच्याही बाबतीत घडू शकते
विमाननगरमधील एसआरए कॉलनीमध्ये काही तरुण रस्त्यावर गोंधळ घालून आरडाओरडा करीत होते. त्यावेळी एका तरुणाने त्यांना शांत राहण्यास सांगितले होते. यावरून रागावरून चार जणांनी लाकडी दांडके व लोखंडी कोयत्याने तरुणावर वार करून गंभीर जखमी केले. विमानतळ पोलिसांनी चौघांवर जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला. विमाननगरमध्ये दोन दिवसांपूर्वी ही घटना घडली होती. त्यामुळे लोकांना काही सांगण्याचीही सोय राहिली नाही.
मुंबईला जायचे म्हणून तिघांनी कॅब बुक केली. त्यानुसार कॅब चालकाने मुंबईच्या दिशेने कार घेतली असताना वाटेत कार थांबवायला सांगितली. त्यानंतर त्यांना धमकावून मारहाण करून रस्त्यावर सोडून कॅब घेऊन चोरटे पसार झाले.
काय काळजी घ्याल
* रस्त्याने जाताना कोणी वाद घालण्याचा प्रयत्न केला तर त्याला प्रत्तिउत्तर देण्याचा प्रयत्न करू नका.
* कोणी भांडण असतील तर त्यांच्यामध्ये जाऊ नका कदाचित तो त्यांचा डाव असू शकतो.
* अशा वेळी पोलिसांना कळवून त्यांची मदत घ्या.