पुणे : शहरासह जिल्ह्यात गुइलेन बॅरे सिंड्रोमचे (जीबीएस) रुग्ण वाढत आहेत. हा संसर्गजन्य आजार नसला तरी कमी प्रतिकारशक्ती असलेली व्यक्ती याची शिकार ठरत आहे. या आजारावरील उपचार परवडणारे नसल्याने बाधितांवर याेग्य उपचार करण्यासाठी शासनाकडून निधीची विशेष तरतूद केली आहे. तसेच खासगी रुग्णालयांमधील उपचाराचे दर नियंत्रित ठेवण्यासाठी विशेष सूचना देण्यात येणार आहे. जीबीएस रुग्णांच्या उपचार करताना औषधांचा गैरवापर, तसेच जास्त पैसे घेतल्यास खासगी रुग्णालयांविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिला.
दोन दिवसांपूर्वी पिंपरी-चिंचवड येथील यशवंतराव चव्हाण हॉस्पिटलमध्ये जीबीएस संशयित, पण न्यूमोनिया झालेल्या महिलेचा मृत्यू झाला होता. त्यामुळे संभाव्य संकट विचारात घेऊन तातडीच्या उपाययोजना करण्याचे आदेश आरोग्यमंत्री आबिटकर यांनी आरोग्य यंत्रणेला दिले आहेत.
दरम्यान, पुण्यात जीबीएस आजाराच्या रुग्णांची संख्या शंभरीपार गेली आहे. त्यामुळे राज्याचा आरोग्य विभाग सतर्क झाला असून, आरोग्यमंत्री आबिटकर यांनी सोमवारी (दि. २७) पुण्यातील नांदेड फाटा येथील सार्वजनिक विहीर तसेच ससून रुग्णालयात भेट देत जीबीएसच्या रुग्णांची विचारपूस घेत रुग्णांना चांगल्या आरोग्यसेवा पुरविण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत.
आरोग्यमंत्र्यांनी केली विहिरीची पाहणी
विहिरीतील दूषित पाण्यामुळे नांदेड गावात काही नागरिकांना जीबीएस आजाराची लागण झाल्याचे निदर्शनास आले आहे. त्याची दखल घेत आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी येथील सार्वजनिक विहिरीची पाहणी केली. पुणे महापालिका, पिंपरी-चिंचवड महापालिका आणि जिल्हा प्रशासनाकडून बाधित भागांमध्ये तातडीने रुग्ण सर्वेक्षण सुरू केले आहे. आरोग्य विभागाची पथके जीबीएसची लक्षणे दिसून येणाऱ्या रुग्णांचा शोध घेत आहेत. पुणे महापालिकेने १५ हजार ७६१ घरांचे सर्वेक्षण केले असून, पिंपरी-चिंचवड महापालिकेने ३ हजार ७१९ आणि ग्रामीणमध्ये ७ हजार ०९८ अशा एकूण २५ हजार ५७८ घरांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे.