भाग्यश्री गिलडा
पुणे: गुगलवरून कस्टमर केअरचा नंबर घेऊन तक्रारींचे निवारण करण्यासाठी गेले असता सायबर चोरट्यांनी शक्कल लढवत मागील पंधरा दिवसांत ५ जणांची फसवणूक करत तब्बल १३ लाख ५३ हजार रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. या गुन्ह्यांची पुण्यातील कोथरुड, चतुःशृंगी, समर्थ, आणि पर्वती पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. असाच प्रकार कोणाच्याही बाबतीत घडू शकतो त्यामुळे कस्टमर केअरला फोन करत असाल तर सावधानता बाळगा.
याबाबत नीता (वय ४०) यांनी सायबर पोलिसात फिर्याद दिली. त्यानुसार, नीता आपल्या आई-वडिलांसोबत उत्तर भारतात दहा दिवसांच्या सहलीसाठी गेल्या होत्या. परतीच्या प्रवासासाठी आग्रा ते मुंबई असा रेल्वेचा प्रवास आधीच बुक केलेला होता; मात्र आई-वडील थकलेले असल्याने रेल्वे तिकीट रद्द करून नीता यांनी विमानाने प्रवास केला. चोवीस तास उलटून गेले तरीही रद्द केलेल्या तिकिटाचे पैसे परत मिळाले नाहीत. याची विचारणा करण्यासाठी महिलेने ग्राहक सेवा केंद्राला फोन केला; मात्र तो बिझी आला. त्यानंतर १५ मिनिटांनी अनोळखी क्रमांकावरून नीता यांना फोन आला.
इंडियन रेल्वे, आयआरसीटीसी मधून बोलत असल्याचे भासवून तुमची अडचण सांगा अशी विचारणा केली. नीता यांनी पैसे परत मिळाले नाहीत, अशी तक्रार केल्यावर यावर ताेडगा काढण्यासाठी दुसऱ्या ॲप्लिकेशनवरून तक्रार नोंदवावी लागेल, असे सांगण्यात आले. त्यांच्या मोबाइलवर आयआरसीटीसीपे.काॅम या वेबसाईटची लिंक पाठवून तक्रार करायला सांगितले. नीता यांनी त्या लिंकवर क्लिक केल्यावर आयआरसीटीसी सारखेच दिसणारे ॲप्लिकेशन दिसल्याने त्यांनी ते ॲप्लिकेशन डाउनलोड केले.
नीता यांनी ते ॲप्लिकेशन डाउनलोड करताच संपूर्ण मोबाईलचा रिमोट ॲक्सेस सायबर चोरट्यांना मिळाला आणि खासगी माहितीचा वापर करून सायबर चोरट्यांनी नीता यांच्या खात्यातून तब्बल ४ लाख रुपये परस्पर ट्रान्स्फर करून घेतले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच नीता यांनी सायबर पोलिस ठाण्यात धाव घेतली.
मॅनेजर महिलेलाच घातला गंडा
भारतीय रेल्वेच्या आयआरसीटीसी ॲपवरून रद्द केलेल्या तिकिटांचे पैसे परत का मिळाले नाही? हे विचारण्यासाठी कस्टमर केअरला फोन केला... फोन व्यस्त आला. साधारण १५ मिनिटांनी अनोळखी क्रमांकावरून फोन येऊन इंडियन रेल्वे मधून बोलत असल्याचे सांगितले. अडचण दूर करण्यासाठी आयआरसीटीसी सदृश दिसणारे ॲप डाउनलोड करण्यास सांगून तब्बल ४ लाख रुपये लंपास केले. हा सगळा प्रकार एक्सेंचर कंपनीत मॅनेजर पदावर काम करणाऱ्या नीता (नाव बदलले आहे) यांच्या बाबतीत घडला आहे.
अशी घ्या काळजी
- ग्राहक सेवा ही मोफत असते त्यामुळे पैशांची मागणी केल्यास तातडीने पोलिसांना कळवावे.- कस्टमर केअरला फोन करताना अगोदर वेबसाईट नीट पडताळून पाहावी.- कोणतेही अनोळखी ॲप डाउनलोड करू नये.- अनोळखी लिंकवर क्लिक करू नये.- फसवणूक झाल्यास तत्काळ सायबर क्राईम पोर्टलला रिपोर्ट करावी. त्यामुळे पोलिसांना आरोपीचे बँक खाते गोठवण्यास मदत होते.