स्टार ११९३
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पारंपरिक पद्धतीने सूर्योदयानंतर दिवस सुरू होत असल्याचे आपल्याकडे मानते जात होते. परंतु, पाश्चिमात्यांचे अनुकरण करताना मध्यरात्री बारानंतर केक कापून वाढदिवस साजरा करण्याचे फॅड आपल्याकडे बोकाळले. इतकेच नाही तर भररस्त्यात मध्यरात्री बारा वाजता गाड्यांवर केक ठेवून आरडाओरडा करीत वाढदिवस साजरा करण्याचे प्रस्थ शहरात मोठ्या प्रमाणावर बोकाळले. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या लक्षात हा प्रकार आल्यावर त्यांनी अशांवर कारवाईचे आदेश दिले. त्यातून शहरात आता रस्त्यावर आरडाओरडा करत वाढदिवस साजरा करण्यावर कारवाई करण्यात सुरुवात झाली आहे. आतापर्यंत किमान एक डझनहून अधिक अशा अतिउत्साही बर्थडे बॉय व त्यांच्या साथीदारांवर कारवाई केली गेली आहे.
याबरोबरच अनेक स्वत:ला ‘भाई’ म्हणविणारे गल्ली बोळातील गुंड आपला वाढदिवस साजरा करताना अनेक केक एका रेषेत ठेवून ते तलवारीने कापून त्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर टाकत होते. तसेच हातात कोयता, तलवारी प्रसंगी पिस्तूल घेऊन त्याचे स्टेटस व्हॉट्सॲपवर ठेवत होते. त्यातून ते परिसरात आपली दहशत पसरविण्याचा त्यांचा हेतू होता. ही बाब लक्षात आल्यावर अशांची झाडझडती घेण्याचे आदेश गुन्हे शाखेला देण्यात आले होते.
गुन्हे शाखेच्या सहाही युनिटकडून सोशल मीडियावर वॉच ठेवून अशा गुंडांची धरपकड सुरू केली. त्यातून अनेक गुंड जेरबंद करण्यात आले. ही मोहीम अजूनही सुरू आहे. नागरिकही असा प्रकार कोठे सुरू असले तर तातडीने पोलीस नियंत्रण कक्षाला कळवू लागले आहेत. पोलिसांच्या या कारवाईमुळे शहरात आता मध्यरात्रीच्या सुमारास रस्त्यावर जल्लोष करीत वाढदिवस साजरा करण्याचे प्रमाण जवळपास बंद झाल्यासारखे आहे.
...तर गुन्हा दाखल
रस्त्यावर उभे राहून जल्लोष करणा-यांवर महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १३५, ३७ (१) या प्रमाणे कारवाई करण्यात येत आहे. त्यात दंडाची तरतूद असून प्रसंगी कारावासही भोगावा लागू शकतो. तसेच रस्त्यावर वाढदिवस साजरा करणाऱ्यांवर महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ११०, ११७ खाली कारवाई करून गुन्हा दाखल केला जाऊ शकतो.