कोरेगाव भीमा : बक्षिसाच्या किंवा लकी ड्रॉच्या माध्यमातून फसवणूक करणाऱ्या सायबर चाेरट्यांनी आता आपल्या पद्धतीत बदल केला आहे. काही दिवसांपासून फेसबुकच्या माध्यमातून पैशाची मागणी करून लोकांची फसवणूक होऊ लागल्याच्या अनेक घटना समाेर आल्या आहेत. त्यामुळे पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहेच. त्याचबरोबर पैशाची मागणी झाली तर संबंधित मित्राकडे त्यासंदर्भात चौकशी करून शहानिशा करावी, असेही सांगितले आहे.
आधुनिक तंत्रज्ञानाचा दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वापर होताना दिसत आहे. महामारीच्या काळात तर डिजिटल पेमेंटचा प्रभावीपणे वापर होताना दिसत आहे. तर दुसरीकडे सोशल मीडियावरही अनेकजण अपटुडेट असल्याचे पाहायला मिळत आहे. याच संधीचा फायदा उचलण्यास सायबर चोरट्यांनी सुरुवात केली आहे. फेसबुकसारख्या प्लॅटफॉर्मवर मित्रमैत्रिणी एकमेकांना जोडले गेले आहेत. काही जणांची फ्रेंडलिस्ट पाहिली तर त्याची संख्या साधारण चार-पाच हजारच्या आसपास जाते. त्याचाच फायदा आता सायबर चोरटे घेत आहेत.
काही दिवसांपासून काही फेसबुक युजरना भलत्याच समस्येला सामोरे जावे लागत आहे. सायबर चोरट्यांनी त्यांचे फेसबुक खाते हॅक करून त्यांच्या नावे त्यांच्याच मित्रांना पैसे मागण्यास सुरुवात केली आहे. त्यातून अनेकांची फसवणूक झाल्याचेही समोर आले आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना याचा मोठा फटका बसला आहे. फेसबुकची लिंक व्हॉट्सॲपवरही शेअर केली जात असून, त्याद्वारेही पैशाची मागणी होत आहे. विशेष म्हणजे, कधी फोन पे, गुगल, पेटीएम यांसारख्या डिजिटल पेमेंट ॲपचा वापर केला जातो तर कधी अन्य बँक खात्याचा केवळ नंबर दिला जातो. यामुळे मित्राला मदत म्हणून डोळेझाकपणे पैसे पाठवल्याचे प्रकार समोर येत आहे.
हे काम करू नका
- अकाउंट लॉगइन करताना पासवर्ड सिक्योर ठेवा. ओपनचा वापर करू नका.
- फेसबुकवर जन्मतारीख टाकू नका. अनेक जण आपली जन्मतारीखच पासवर्ड ठेवतात. यामुळे हॅकर्स युजर्सचं अकाउंट हॅक करू शकतात.
- मोबाईल नंबर फेसबुकवर टाकू नका. मोबाईल नंबर ठेवला तरी त्यासाठी ‘ओन्ली मी’ सेटिंगचा वापर करा, यामुळे तुमचा मोबाईल नंबर समजणार नाही.
नागरिकांनी हे करायला हवे
सुरुवातीला ज्यांच्या नावाचे बनावट फेसबुक खाते बनवले आहे, त्यांनी स्वत:च्या फेसबुक खात्यावरून किंवा मित्रांना ज्या प्रोफाईलवरून रिक्वेस्ट गेली आहे, त्यांच्याकडून सदर बनावट खात्याची लिंक मागवून घ्यावी. बनावट खात्यावर गेल्यानंतर उजव्या बाजूला तीन डॉट दिसतील. त्या डॉटवर क्लिक करा तुमच्यासमोर find support of report profile हा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा. pretending to be someone हा पहिला पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा. पुढे तुम्हाला ३ पर्याय दिसतील. to Me - friend - celibrity आपण आपल्याच बनावट खात्याला रिपोर्ट करत असल्यास त्यापैकी to पर्याय हा सिलेक्ट करून आणि नेक्स्ट वर क्लिक करा. त्यानंतर तुमच्या नावे तयार झालेले बनावट खाते काही वेळाने आपोआप बंद होईल.
एटीएमबाबत सुरक्षितता महत्त्वाची
अनेकदा फ्री काही मिळतंय म्हणून ते मिळण्याच्या नादात अनेक नागरिक फसलेले समोर येत आहे. अनेक नागरिकांना तुम्ही ईएमआयवर काही खरेदी केली आहे का? असा फोन आल्यानंतर समोरून तुम्हाला कॅशबॅक स्वरुपात रक्कम मिळाली असल्याचे सांगण्यात येत आहे. यात तुम्हाला मोबाईलमध्ये विशिष्ठ असे अॅप डाऊनलोड करण्यास सांगितले जाते. त्यानंतर त्या अॅपमध्ये तुमच्या एटीएमचा फोटो काढण्यास सांगत फोन पे किंवा गुगल पे ओपन करून त्यामध्ये एक मेसेज येतो. त्या मेसेजमध्ये विशिष्ट रक्कम टाकलेली असते व फोनवरील व्यक्ती तुम्हाला फोन पे, गुगल पेचा पिन टाकण्यास सांगते. हा पिन टाकताच आपल्या खात्यातील रक्कम ट्रान्सफर होत आपली फसवणूक होते. यासाठी अशा फसव्या व फ्री काय मिळतंय या प्रलोभनाला बळी न पडता एटीएमची सुरक्षा आपणच जपली पाहिजे.