पुणे : सध्या दिवाळीचे सर्वांना वेध लागले असून, त्यामुळे गोडधोड पदार्थांना मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. मागणी वाढली की, पुरवठा करण्यासाठी माल कमी असल्यावर त्यात भेसळ करून तो वाढविण्यात येतो. पनीर, खवा, दुध आदींमध्ये भेसळ करून असे प्रकार होत असल्याचे यापूर्वी स्पष्ट झाले आहे. त्यामुळेच आता अन्न व औषध प्रशासनाने दिवाळीपूर्वीच कंबर कसली असून, भेसळ करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
पुणे जिल्ह्याच्या ‘एफडीए’कडे आता १४ अन्न सुरक्षा अधिकारी कार्यरत आहेत. त्यामुळे अपुऱ्या मनुष्यबळावरच ‘एफडीए’चा कारभार सुरू आहे. पण, अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांची संख्या कमी असले तरी कारवाई किंवा तपासणी करण्यात येणार आहे. पुणे जिल्ह्यात आजपासून (दि. ६) विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. दिवाळीत मिठाई, खवा, मावा, तूप, तेल या पदार्थांना मागणी वाढते. या काळात अन्न पदार्थांच्या नमुन्याचे संकलन होणार आहे.
गणपतीच्या कालावधीमध्ये ‘एफडीए’ने पुणे जिल्ह्यामध्ये ३०८ पदार्थांचे नमुने गोळा करण्यात आले होते. त्यातील १४४ आस्थापनांना नोटीस बजावण्यात आली. या कालावधीत ३१ लाख २ हजार ४७ रुपयांच्या भेसळयुक्त अन्न पदार्थांचा साठा जप्त केला आहे. दिवाळीमध्येही कारवाईमध्ये सातत्य असणार आहे.
इथे करा तक्रार
‘एफडीए’ दुकानांमधून पदार्थांचे नमुने गोळा करते. परंतु, जर नागरिकांना कुठे भेसळयुक्त पदार्थ आढळून आले तर त्यांनी देखील आमच्याकडे तक्रारी कराव्यात, असे आवाहन ‘एफडीए’ अधिकाऱ्यांनी केले आहे. नागरिकांनी 1888-463-6332 या क्रमांकावर तक्रार द्यावी.
यात सर्वाधिक भेसळ
सणाच्या काळात तेल, खवा, दूध, गायीचे तूप, बटर, मिठाई, मावा, पनीर अशा पदार्थांमध्ये सर्वाधिक भेसळ केली जाते. म्हणून या पदार्थांच्या विक्रीवर एफडीएचे लक्ष असणार आहे.
हे लक्षात ठेवा
-खाद्य पदार्थ घेताना तपासून घ्यावे-पदार्थावर ‘एक्सपायरी डेट’ आहे का ते पहावे-उघड्यावरील पदार्थ घेऊ नयेत- योग्य दुकानातून मिठाई, दुधाचे पदार्थ घ्या- लवकर खराब होणाऱ्या पदार्थांना फ्रिजमध्ये ठेवू शकता
वनस्पती तूप, खवा, मैदा अशा पदार्थांमध्ये खूप भेसळ होते. त्यामुळे संबंधित सर्व अधिकाऱ्यांनी दुकानांमधून पदार्थांचे नमुने गोळा करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच नागरिकांनी देखील ‘एफडीए’कडे तक्रार करावी. - सुरेश अन्नपुरे, सहआयुक्त, अन्न व औषध प्रशासन, पुणे विभाग