पुणे: तोरणा किल्ल्यावर सलग दोन दिवस दोन तरुण गिर्यारोहकांचा मृत्यू झाल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. कोरोनानंतर तरुणाई पुन्हा एकदा भटकण्यासाठी सज्ज झाली आहे; परंतु या घटनेमुळे पुन्हा एकदा डोंगर भटकंती करताना काळजी घेण्याची गरज या क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. रविवारी (दि. १३) ओमकार भरमगुंडे (वय २१) या तरुणाचा डोक्यात दगड पडून मृत्यू झाला. बिन्नी दरवाजाच्या शेवटच्या चढाईत माकडांची भांडणे सुरू असताना काही दगड निसटून खाली आले. ओमकारला दगड वाचवता न आल्याने त्याला डोक्यात दगड पडला. जखमेतून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला. त्यामुळे तो जागीत मृत्युमुखी झाला.
तर शनिवारी (दि. १२) निरंजन धूत (वय २२) या तरुणाला कठीण चढाईमुळे मळमळणे, घाम येणे असा त्रास झाला. त्यानंतर त्याला रुग्णालयात हलवले परंतु, त्याचा तत्पूर्वीच हृदयविकाराच्या धक्क्याने त्याचा मृत्यू झाला.
माकडांचा उच्छाद
तोरणा किल्ल्याच्या गडावर आणि डोंगरावर माकडांच्या टोळ्या आहेत. त्यांच्यामध्ये संघर्ष चालू असतो. पर्यटकांसोबतही बऱ्याचदा माकडांची झडप होते. या टोळ्यांमधील नर हे अधिक आक्रमक असतात. सततच्या माणसांच्या संपर्कामुळे त्यांची माणसांबद्दलची भीड चेपलेली आहे.
खायला देऊ नये
माकडांना खायला दिल्यामुळे गिर्यारोहकांचा खाऊसाठी त्यांच्याकडून पाठलाग गेला जातो. त्यातून बऱ्याचदा खाण्याच्या वस्तू पळविण्याचे प्रकार घडतात. त्यातून मनुष्य आणि प्राणी असा संघर्ष निर्माण होतो.
घ्यायची काळजी
१) जंगली प्राण्यांपासून अंतर ठेवणे.
२) जवळ काठी बाळगावी.
३) जंगली लाड करू नयेत.
४) भटकंती करताना उग्र परफ्युम, सेंट वापरू नयेत.
५) प्राणी आक्रमक होतील असा त्रास देऊ नये.
''गिरीभ्रमंती हा छंद चांगला असला तरी त्याचे धोके लक्षात घेणे गरजेचे आहे. कुणीही उठून कुठल्याही किल्ल्यावर ट्रेकिंगला जाण्याअगोदर त्या किल्ल्याच्या काठिण्यपातळीचा आणि आपल्या शारीरिक क्षमतेचा अंदाज घ्यावा. स्थानिकांचे मार्गदर्शन घ्यावे. कठीण किल्ला सर करताना छोट्या टेकड्यांवर सराव करावा. असे केले तर किल्ला चढताना हृदयविकार येणे अशा घटना घडणार नाहीत असे योगेश काळजे (संपादक, दुर्गांच्या देशातून, ट्रेकर) यांनी सांगितले.''