खबरदार जर पक्षाविरोधात बोलाल : अजित पवार यांची तंबी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2018 04:15 PM2018-05-22T16:15:34+5:302018-05-22T16:16:32+5:30
सोमवारी पार पडलेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवक अमृता बाबर यांनी स्वपक्षीयांचेच वाभाडे काढले होते.
पुणे : अन्याय होत असेल त्याकडे त्याची दखल घेतली जाईल मात्र सभागृहात पक्षाच्या विरोधात बोलणे खपवून घेतले जाणार नाही अशा शब्दात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नगरसेविका अमृता बाबर यांच्यासह सर्व नगरसेवकांना सुनावले. पुण्यातल्या आढावा बैठकीत ते बोलत होते.
सोमवारी पार पडलेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवक अमृता बाबर यांनी स्वपक्षीयांचेच वाभाडे काढले होते. इतकेच नव्हे नाराजी व्यक्त करताना त्यांनी संतापात महिला व बालकल्याण समितीच्या सभासदत्वाचा राजीनामाही दिला. त्यांच्या या रुद्र अवताराची कोणालाच कल्पना नसल्याने विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांच्यासह साऱ्यांचीच तोंड पडली होती. त्यानंतर मंगळवारी झालेल्या बैठकीत पवार यांनी या घटनेची दखल घेतल्याचे दिसून आले. इतकेच नव्हे तर त्यांनी बाबर यांच्या वक्तव्यामागील कारणेही मागवली आहेत. मात्र त्यावर न थांबता त्यांनी बाबर यांच्यासह पक्षविरोधात महापालिकेच्या सभागृहात बोलणाऱ्या सर्वच नगरसेवकांना सुनावले आहे. पक्षात अन्यायाची दखल घेतली जाईल. परंतू सभागृहात अशा गोष्टी बोलणे पक्षाला मान्य नाही. हा प्रकार खपवून घेतला जाणार नाही अशा तिखट शब्दात सुनावयालाही ते विसरले नाहीत.