लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १० लाख ६६ हजार पुणेकरांवर वाहतूक पोलिसांनी ‘सीसीटीव्ही’च्या माध्यमातून कारवाई केली आहे. त्यांच्यावर तब्बल ५१ कोटी १४ लाख ६८ हजार २०० रुपयांचा दंड ठोठावला आहे.
राज्यात पुणे शहरात सर्वप्रथम ‘सीसीटीव्ही’चे नेटवर्क उभारण्यात आले. वाहतूक शाखेच्या माध्यमातून येरवड्यातील अद्ययावत नियंत्रण कक्षामार्फत शहरातील सर्व चौकात बसविण्यात आलेल्या सीसीटीव्हीमार्फत बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई केली जाते. पुण्यात सध्या बाराशेपेक्षा जास्त सीसीटीव्ही वाहनचालकांवर नजर ठेऊन आहेत.
वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी सांगितले की, शहरातील वाहतूकीचे नियमन करताना सीसीटीव्हीद्वारे उल्लंघन करणार्या वाहनांवर कंट्रोल रुममार्फत कारवाई केली जाते. राज्याच्या मध्यवर्ती कंट्रोल रुमवरुन या वाहनांचे चलन केले जाते व ते त्यांच्या मोबाईलवर एसएमएसद्वारे पाठविले जाते. गेल्या वर्षी १०९ कोटी रुपयांचा दंड आकारणी करण्यात आली होती. त्यापैकी ३९ कोटी रुपये वसूल करण्यात आले. २०२० मध्ये सुमारे ७५ कोटी रुपयांचा दंड आकारण्यात आला. यातला १५ कोटी रुपयांचा दंड वाहनचालकांनी भरला आहे. दंडाची मोठी रक्कम बाकी आहे. १ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर दरम्यान दुपारी ३ ते ५ वाजेदरम्यान विशेष मोहीम राबविण्यात आली होती. त्यात २ कोटी ७१ लाख रुपयांचा दंड वसुली करण्यात आली.
शहरात सीसीटीव्हीमार्फत विना हेल्मेट वाहनचालकांवर सर्वाधिक कारवाई सध्या होत आहे. त्याखालोखाल सिग्नलला झेब्रा कॉसिंगवर उभ्या राहणार्या वाहनांवर कारवाई होत असते.
......
यासाठी झाला दंड (१ जानेवारी ते २० डिसेंबर)
एकूण खटले दंडाची रक्कम (रुपये)
विना हेल्मेट ९,९४,०८२ ४ कोटी ९७ लाख ४१ हजार
झेब्रा क्राॅसिंग ५०,६९४ १ कोटी १ लाख ३८ हजार ८००
नो पार्किंग १७,५४८ ३५ लाख ९ हजार ६००
ट्रिपल सीट २,५१३ ५ लाख २ हजार ६००
नो एंट्री १,३८१ २ लाख ७६ हजार २००
एकूण १०,६६,२१८ ५१ कोटी १४ लाख ६८ हजार २००
चौकट
थकीत दंडवसुलीसाठी विशेष कारवाई
“१ नोव्हेंबर ते १२ डिसेंबरपर्यंत वाहतूक शाखेने ३ कोटी ७९ लाख रुपयांचा दंड वसुल केला. यापुढेही वाहतूक शाखेकडून विशेष मोहीमेद्वारे वाहनचालकांकडून दंडवसुलीची केली जाणार आहे. नागरिकांनी वाहतूकीच्या नियमांचे पालन केल्यास पोलिसांना दंडात्मक कारवाई करण्याची वेळ येणार नाही.”
राहुल श्रीरामे, पोलीस उपायुक्त, वाहतूक शाखा