“भगतसिंह कोश्यारींनी ‘ते’ पत्र सर्वांसमोर आणावे”; अजित पवारांनी स्पष्टच सांगितले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2023 11:33 PM2023-02-20T23:33:25+5:302023-02-20T23:34:00+5:30
भगतसिंह कोश्यारी आता राज्यपाल पदावर नाहीत, त्यामुळे त्यांनी केलेल्या आरोपांना उत्तर देण्यास मी बांधील नाही, असे अजित पवार म्हणाले.
पुणे: माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राजीनाम्यानंतर माध्यमांशी बोलताना तत्कालीन महाविकास आघाडी सरकार आणि उद्धव ठाकरेंवर टीका करताना काही गंभीर आरोप केले. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना पत्रकारांनी प्रतिक्रिया विचारली. माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या गंभीर आरोपांवर बोलताना अजित पवार म्हणाले, भगतसिंह कोश्यारी यांना धमकी दिली असेल तर ते पत्र रेकॉर्डवर असेल, ते पत्र त्यांनी सर्वांसमोर आणावे. भगतसिंह कोश्यारी यांच्याजवळ खरेच पत्र असेल तर त्यांनी मीडियाला द्यावे आणि ते जनतेसमोर आणावे. म्हणजे दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल, असे अजित पवार यांनी स्पष्टपणे सांगितले.
भगतसिंह कोश्यारी आता राज्यपाल पदावर नाहीत, त्यामुळे त्यांनी केलेल्या आरोपांना उत्तर देण्यास मी बांधील नाही. आता आमच्यासाठी निवडणूक महत्त्वाची आहे. आम्ही निवडणुकीमध्ये लक्ष घातले आहे. दिवसभर रवींद्र धंगेकरांच्या रॅलीत होतो. त्यामुळे ते काय बोलले ते मी नीट ऐकले नाही. ते जे काही बोलले ते उद्या ऐकेन आणि त्यानंतर उत्तर देईन, असे अजित पवार म्हणाले.
दरम्यान, आज महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी रॅली काढली होती. त्याला कसबा मतदार संघातील पुणेकरांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. रात्रीचे १० वाजेपर्यंत कार्यकर्त्यांचा उत्साह टिकून राहिला. मी आणि रवींद्र जेव्हा पुणेकरांना अभिवादन करत होतो तेव्हा ते अतिशय मनापासून आम्हाला प्रतिसाद देत होते, असेही त्यांनी सांगितले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"