पुणे : अभियांत्रिकी महाविद्यालयात अंतिम वर्षाचे शिक्षण घेणाऱ्या भाग्यश्री सुडे खून प्रकरणात पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातून सोन्याचे दागिने व मोबाइल जप्त केले आहेत. आरोपींनी भाग्यश्रीचा मोबाइल मुखेड (जि. नांदेड) येथील कचऱ्याच्या कुंडीत टाकून दिला होता. बुधवारी (ता. १०) पोलिसांनी तो जप्त केला. तसेच आरोपींच्या ताब्यातून सोनसाखळी आणि कानातलेदेखील हस्तगत केले आहेत.
भाग्यश्री सूर्यकांत सुडे (२२, रा. लिव्हिंग प्रिसो हाऊस साकोरेगनर, विमानगर, मूळ - मु. पो. हरंगुळ बुद्रुक, ता. जि. लातूर) या महाविद्यालयीन तरुणीचा तिच्या मित्राने अन्य दोन साथीदारांना सोबत घेऊन खंडणीसाठी अपहरण करून ३० मार्च रोजी खून केला होता.
या प्रकरणी विमानतळ पोलिसांनी शिवम माधव फुलवळे (२१, रा. ऑक्सीहेवन सोसायटी, वाघोली, मूळ - नांदेड), सुरेश शिवाजी इंदोरे (२३, रा. मुंबई, मु. सकनूर, जि. नांदेड) आणि सागर रमेश जाधव (२३, रा. कासलेवाडी, ता. शिरोळा अनंतपाळ, जि. लातूर) या तिघांना अटक केली आहे. शिवम हा या घटनेतील मुख्य सूत्रधार असून, तो भाग्यश्रीसोबत एकाच महाविद्यालयात अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होता. तिघे आरोपी सध्या विमानतळ पोलिसांच्या कोठडीत असून, त्यांची कसून चौकशी सुरू आहे.
आरोपींकडून ९ लाखाच्या खंडणीसाठी भाग्यश्रीचा खून केल्याचे सांगण्यात येते आहे. मात्र असे जरी असले तरी पोलिसांना अन्य गोष्टीबाबत संशय आहे. त्या अनुषंगाने पोलिस तपास करत आहेत. आरोपींनी भाग्यश्रीचा खून केल्यानंतर तिचा मृतदेह जाळून पुरण्यापूर्वी तिच्या अंगावरील दागिने काढून घेतले होते. तसेच तिच्या मोबाइलवरून खंडणीची मागणी केल्यानंतर, मोबाइल फेकून दिला होता. पोलिस या सर्व गोष्टी जप्त करण्याचा प्रयत्न करत होते. बुधवारी शिवम याच्या नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील माळाकोळी गावात जात पोलिसांनी झाडाझडती घेतली. त्यावेळी दागिने आणि मोबाइल मुखेड येथे मिळून आला. मिळालेल्या मोबाइलचे तांत्रिक विश्लेषण केल्यानंतर काही गोष्टी समोर येण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. तसेच या गुन्ह्यामागचे नेमके कारणही समोर येण्यास मदत होईल असे पोलिसांचे म्हणणे आहे. ज्या गाडीतून भाग्यश्रीचे अपहरण करून खून करण्यात आला, तीच गाडी घेऊन आरोपींनी नांदेड गाठले होते.