पुणे : दत्ता पासलकर हे धरणग्रस्तांचे नेते होते. त्यांनी जनतेचे प्रश्न कायम उचलून धरले. या झुंजार नेत्याच्या नावाचा पुरस्कार भार्इंसारख्या झुंजार नेत्याला मिळणे, ही कौैतुकास्पद बाब आहे. राष्ट्रसेवा दलातील त्यांचे कार्य वाखाणण्याजोगे आहे. त्यांनी तरुणांमध्ये पेटवलेली ज्योत अजूनही धगधगते आहे. समाजहितासाठी झटणारी माणसे दीर्घायू व्हावीत, असे मत माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी व्यक्त केले.पाटील यांच्या हस्ते ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य यांना साथी दत्ता पुरस्कार प्रदान करण्यात आला. दत्ताजीराव पासलकर ग्रंथालय, अभ्यासिका व पानशेत वरसगाव धरणग्रस्त सेवा संघाच्या वतीने दत्ताजीराव पासलकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हा पुरस्कार दिला. त्या कार्यक्रमात पाटील बोलत होत्या. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. कुमार सप्तर्षी अध्यक्षस्थानी होते. अॅड. प्रताप परदेशी, अंकुश काकडे आदींच्या उपस्थितीत सिंहगड रस्त्यावरील वीर बाजी पासलकर स्मारक येथे कार्यक्रम पार पडला. संजय पासलकर यांनी प्रास्ताविक केले. प्रिया निघोजकर यांनी सूत्रसंचालन केले. शरद चव्हाण यांनी आभार मानले.
सप्तर्षी म्हणाले, ‘भाई वैैद्य हे समाजवादी विचारसरणीचे भीष्माचार्य आहेत. पुण्याच्या पातळीवर एस. एम. जोशी हे गांधीजींच्या तर भाई सरदार वल्लभभाई पटेल यांच्या भूमिकेत होते. अण्णांच्या मागे संघटन करण्याचे कार्य भार्इंनी पार पाडले. समाजवादाचा धर्म सत्याग्रहाचा असतो. समाजकारण करायचे असेल तर ते खेड्यातून करावे.’भाई वैैद्य म्हणाले, ‘दत्ताजी पासलकर कमी बोलत आणि खूप काम करत. त्यांनी समाजवादी आंदोलनात अनेक वर्षे काम केले. कोणतीही अपेक्षा न करता समाजवादाने प्रेरित होऊन काम करणारे ते व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या नावाने मिळालेला पुरस्कार खूप मोलाचा असून, भविष्यात काम करण्याची उमेद देत राहील.’