: ..गड आला पण सिंह गेल्याचीही रुखरुख
लोकमत न्यूज नेटवर्क
पिरंगुट : नांदे (ता. मुळशी) येथील ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये प्रशांत रानवडे यांच्या श्री भैरवनाथ विकास पॅनेलने बाजी मारत ९ पैकी ६ जागांवर विजय संपादन करून वर्चस्व प्रस्थापित केले आहे.
श्री भैरवनाथ विकास पॅनेलने या निवडणुकीमध्ये प्रचारात शेवटपर्यंत आघाडी घेतली होती. पॅनेलला यशदेखील मिळाले आहे. वाॅर्ड क्रमांक १ मधून चिंतामण ढमाले, हेमलता रानवडे, निकिता रानवडे हे निवडून आले. तर वाॅर्ड क्र.३ मधून सुनील जाधव, आरती रानवडे, संघमित्रा ओव्हाळ (बिनविरोध निवड) हे उमेदवार निवडून आले आहेत.
श्री भैरवनाथ विकास पॅनेलसाठी वाॅर्ड क्रमांक २ मध्ये मात्र सगळ्यात जास्त संघर्ष होता. त्याला कारणही तसेच होते. नांदे गावचे माजी सरपंच प्रशांत रानवडे यांच्या पत्नी पायल रानवडे यांच्यासह इतर दोन्ही उमेदवार या पॅनेलमध्ये उभे होते. दुर्दैवाने या तिन्ही उमेदवारांना पराभवाला सामोरे जावे लागले व त्या ठिकाणी अनिकेत रानवडे, सयाजी रानवडे व प्रिती करंजावणे हे तीन उमेदवार निवडून आले.
गड आला पण सिंह गेला
भैरवनाथ विकास पॅनेलचा ९ पैकी ६ जागा जिंकत मोठे यश संपादन केले. दोन नंबर वाॅर्डमध्ये प्रशांत रानवडे यांच्या पत्नी पायल रानवडे यांचा पराभव झाला. त्यांच्या या पराभवामुळे नांदे ग्रामपंचायत स्थापने नंतरचा म्हणजेच १९६५ पासूनचा प्रशांत रानवडे यांच्या घराण्यातील हा पहिलाच पराभव आहे. त्यांच्यासह इतर दोन उमेदवारांचा पराभव झाल्यामुळे 'गड आला पण सिंह गेला' अशी अवस्था भैरवनाथ विकास पॅनलची झालेली आहे. याही प्रसंगात प्रशांत रानवडे यांनी सर्वांना धीर देत विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले व पराभूत उमेदवारांना धीर देत खचून न जाता पुन्हा उमेदीने कामाला लागावे व झुंजार लढत देत यश संपादन करावे, असे सांगत विजयाचा जल्लोष केला
फोटो ओळ : नांदे ग्रामपंचायतीचे विजयी उमेदवार मान्यवर व ग्रामस्थ आनंदोत्सव साजरा करतानाचा क्षण.