कडूस : खेड तालुक्यातील पश्चि भागातील मोठी ग्रामपंचायत व बाजारपेठ असणाऱ्या कडूस गावची यात्रा दरवर्षाी आजच्या दिवशी मोठ्या उत्साहात होत असते मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा ती रद्द झाली. श्री भैरवनाथ आणि जोगेश्वरी यांच्या मूर्तींची पूजाअर्चा करून भैरवनाथ महाराजांचे पूजन करण्यात आले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या दिलेल्या सूचनांचे पालन करण्यासाठी यंदाही कडूस यात्रा उत्सव समितीने यात्रा साजरी रद्द करण्याचा औपचारिक निर्णय घेतला. गावची परंपरा म्हणून कडूस गावचे आराध्य दैवत श्री भैरवनाथ आणि जोगेश्वरी यांच्या मूर्त्यांची पुरोहितांकडून अभिषेक व पूजा केली जाते. सर्व कडूसच्या भाविकांकडून, यात्रा उत्सव समितीमार्फत देवांना हारतुरे व सरंजामी, भरजारी पोशाख अर्पण करण्यात येतो. मात्र तो उत्सव रद्द केला आणि आज चैत्र वद्य पंचमीला सकाळीच मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत गावातून हारतुरे, मंडपासाठीच्या आंब्याच्या डहाळ्यांची पारंपरिक वाद्यांच्या गजरात साध्या पद्धतीने मिरवणूक काढण्यात आली.
कडूस गावचे नवनिर्वाचित सरपंच निवृत्ती नामदेव नेहेरे यांच्या हस्ते देवालयाचे गुरव अण्णा हिरवे यांच्याकडे हारतुरे आणि देवासाठीचा पोशाख अर्पण केला. यावेळी भैरवनाथ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष दत्ता ढमाले, यात्रा कमेटीचे अध्यक्ष प्रतापराव ढमाले, अप्पा धायबर,शिवाजी बंदावणे, सखाराम ढमाले पाटील, पुरोहित भूषणकाका पारखी ,शिवाजी ढमाले, चांगदेव ढमाले, दीपक चिखले आदी कार्यकर्ते उपस्थित होते. देवाचा गाभारा बंद असल्याने उपस्थित भाविकांनी दूरूनच दर्शन घेतले.