पुणे : ‘लोकमत’चे संस्थापक स्वातंत्र्यसंग्राम सेनानी स्व. जवाहरलालजी दर्डा (बाबूजी) यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आज (दि. १ जुलै) सुप्रसिद्ध गायिका पद्मश्री डॉ. अनुराधा पौडवाल यांच्या भजन-गझल संध्या या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. जवाहरलालजी दर्डा यांना आदरांजली वाहण्यासाठी लोकमत मीडिया ग्रुपतर्फे या मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी (दि. १) महालक्ष्मी लॉन्स, डी.पी.रोड येथे संध्याकाळी ६.३० वा. हा कार्यक्रम होणार आहे.
जवाहरलालजी हे चौफेर व्यक्तिमत्त्वाचे धनी होते. त्यांनी समाजकारण, राजकारण, संस्कृती अशा क्षेत्रांमध्ये मोठे योगदान दिले. त्यांनी राज्य सरकारमध्ये मंत्रिपदही भूषविले. काँग्रेस पक्षामध्ये अनेक संघटनात्मक पदांचा कार्यभार सांभाळताना त्यांनी तरुण आणि ज्येष्ठांमध्ये सुसंवादाचा दुवा म्हणून काम केले. ‘लोकमत’ या वृत्तपत्राच्या माध्यमातून त्यांनी सर्वसामान्य जनतेच्या आकांक्षांना अभिव्यक्तीसाठी हक्काचे व्यासपीठ मिळवून दिले. लोकमत सखी मंच, लोकमत दरबार, लोकमत मराठी भाषा संमेलन असे अनेक समाजाभिमुख उपक्रम हे जवाहरलालजींच्या दूरदृष्टीचे फलित आहे. वृत्तपत्राने नैसर्गिकरीत्या घराघरात आणि मनामनात स्थान निर्माण करावे हे स्वप्न त्यांनी पाहिले होते. त्यांनी आखून दिलेली पाऊलवाट चोखाळत लोकमत आज खऱ्या अर्थाने मनामनात पोहोचला आहे. त्यांच्या या बहुआयामी कर्तृत्वाला सलाम करण्याची संधी या कार्यक्रमाच्या रूपाने नागरिकांना मिळणार आहे.
या कार्यक्रमासाठी शहर आणि परिसरातील राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, साहित्य या क्षेत्रांतील दिग्गज आणि नामवंत व्यक्ती उपस्थित राहणार आहेत.