बारामती : जिल्हा परिषद अध्यक्षांच्या नीरावागज गावातील डोंबाळे-मदनेवस्ती जिल्हा परिषद शाळेला पहिल्याच दिवशी शिक्षकांची बदली रद्द करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी सुरू केलेले आंदोलन सुरूच आहे. सोमवारी (दि. १८) शाळेच्या प्रवेशद्वारावर ग्रांमस्थांनी भजन-कीर्तन करून निषेध केला. मंगळवारी (दि. १९) चूलबंदची हाक दिली आहे.सन २०१६-१७ या शैक्षणिक वर्षात गावात संतोष गावडे, आबासाहेब कदम हे दोन शिक्षक रुजू झाले. त्यांनी ग्रामस्थांच्या सहभागातून जिल्हा परिषद शाळेचा, तेथील विद्यार्थ्यांचा कायापालट केला आहे. या दोन शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी विशेष प्रयत्न केले. मात्र, नुकत्याच झालेल्या आॅनलाईन बदल्यांमध्ये गावडे, कदम या दोन्ही शिक्षकांच्या बदल्या झाल्या. यामुळे ग्रामस्थ संपप्त झाले आहेत. त्यांच्या जागी सुवर्णा आडके, श्रीपाद देशपांडे यांच्यासह इनामदार (पूर्ण नाव समजले नाही) हे शिक्षक नव्याने रुजू होण्यासाठी आले. मात्र, त्यांना ग्रामस्थांनी रुजू होऊ दिले नाही. शाळेच्या पहिल्याच दिवशी ठोकलेले टाळे अद्याप कायम आहेत. आज (सोमवार, दि. १८) सकाळपासूनच टाळ-मृदंगाच्या गजरात भजन-कीर्तन म्हणत ‘शासनाला सुबुद्धी दे’ असे साकडे ग्रामस्थांनी घातले. सकाळी सुरू झालेले भजन दुपारी १ पर्यंत सुरू होते.दुपारी पंचायत समिती सभापती संजय भोसले, गटशिक्षणाधिकारी किशोर पवार, पंचायत समिती सदस्य राहुल झारगड, रतनकुमार भोसले, नीरावागजच्या सरपंच डॉ. मीनाक्षी देवकाते, माजी सरपंच स्वाती देवकाते, सदस्य स्वाती जगदीश देवकाते, विस्तार अधिकारी संजय जाधव यांनी येथील ग्रामस्थांची भेट घेऊन समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, ग्रामस्थांनी निर्णयावर ठाम राहण्याची भूमिका घेतली. आणखी महिनाभर शाळा बंद राहिली तरी चालेल. आमच्या मुलांच्या होणाऱ्या शैक्षणिक नुकसानाची आम्ही जबाबदारी घेतो. विद्यार्थ्यांची शाळा बुडत असूनदेखील आमची तक्रार नाही. मात्र, आमच्या शिक्षकांची बदली रद्द करा. त्यांना याच शाळेत रुजू करा; अन्यथा आमच्या सर्व विद्यार्थ्यांचे दाखले काढण्याची परवानगी द्या. आम्ही मुलांना खासगी शाळेत प्रवेश घेऊ, या पवित्र्यावर ग्रामस्थ ठाम आहेत. व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष काकासोा. डोंबाळे, विठ्ठलराव देवकाते, कोकरे, सुनील गावडे, सुधीर देवकाते, रणजित मदने, पोपट सूळ, बाळासोा. कुंभार, पोपट देवकाते आदी पालकांनी चर्चेत सहभाग घेतला.>...बदली रद्द करण्याचा अधिकार शिक्षणमंत्र्यांनायाबाबत पंचायत समितीचे सभापती संजय भोसले यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले, की या शाळेतील शिक्षकांच्या बदल्या आॅनलाईन झालेल्या आहेत. आबासाहेब कदम यांची बदली तालुक्याबाहेर भोर येथे झाली आहे. त्यामुळे प्रशासकीय पातळीवरील हा निर्णय असल्याने त्यामध्ये हस्तक्षेप करणे शक्य नाही. तालुक्याबाहेरील बदलीचा अधिकार सभापतींना नसतो, हा अधिकार शिक्षणमंत्र्यांना आहे. त्यामुळे शिक्षक कदम यांची बदली रद्द करण्याचा अधिकार शिक्षणमंत्र्यांना आहे. मात्र, संतोष गावडे यांची बदली तालुक्यातच सिद्धेश्वर निंबोडी येथे झाली आहे. ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतल्यास गावडे यांना त्याच शाळेत मुख्याध्यापकपदी ठेवू, असे सभापती भोसले म्हणाले.
शिक्षकांची बदली रद्द करण्यासाठी प्रवेशद्वारावर केले भजन-कीर्तन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2018 1:56 AM