हडपसर : उपनगराची चारही बाजूंनी लोकवस्ती गेल्या काही वर्षांत झपाट्याने वाढली आहे. यात रोजच जेवणात लागणारा भाजीपालाही सर्वांचीच गरज आहे; परंतु गेल्या काही वर्षांपासून मुख्य रस्त्यावरच भाजी विक्रेत्यांनी आपली दुकाने मांडली आहेत. त्यामुळे वाहतुककोंडी होत आहे. हडपसर गाडीतळ पुणे-सोलापूर महामार्गावर आणि ससाणेनगर व हांडेवाडी रस्त्यावर भरणाºया भाजी बाजाराला महापालिका पर्याय शोधणार का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.हडपसर उपनगराची लोकवस्ती वाढली आहे. वाढत्या लोकवस्तीत रहिवाशांच्या गरजादेखील वाढल्या आहेत. यात रस्ते, पाणी, वीज व आरोग्याच्या सुविधा महापालिका पुरविण्यात नेहमीच कमी-अधिक प्रयत्न करीत असते. वाढत्या लोकवस्तीत भाजी मार्केटची सुविधा मात्र महापालिकेला अद्याप पूर्ण करता आलेली नाही. अनेक वर्षांच्या भाजी मंडईत अपुºया जागेत भाजी मंडई भरत असून, येथे दुर्गंधीचे साम्राज्य आहे.पार्किंग नाही. स्वच्छता नाही. अस्ताव्यस्त बैठक व्यवस्थेमुळे बकालपणा असून, अनेक समस्येच्या गर्तेत भाजी मंडई आहे. त्यातच हडपसर क्षेत्रीय कार्यालयांतर्गत असलेल्या भागात पुणे-सोलापूर महामार्ग, ससाणेनगर रस्ता, हांडेवाडी रस्ता व काळेपडळ रस्ता या भागात मुख्य रस्त्यावरच अनधिकृतपणे भाजीपाला बाजार गेल्या काही वर्षात वसला आहे.हडपसर येथे मुख्य रस्त्यावर भाजीपालाविक्रेते बसत असल्याने ग्राहक रस्त्यावरच वाहने उभी करून, तर रस्त्यावर वाहतुकीकडे दुर्लक्ष करत चालत जाऊन भाजीपाला घेतात. त्यामुळे रस्त्यावर अनेकदा वाहतूक- कोंडीदेखील होत असते; परंतु रस्त्यावर भरणाºया भाजीपाला बाजाराला महापालिका पर्याय शोधणार का, असा सवाल उपस्थित होत आहे.
रस्त्यावरच भरते भाजी मंडई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2017 2:53 AM