पुणे : ‘कोसला’कार भालचंद्र नेमाडे शनिवारी फर्ग्युसन गौरव पुरस्कारासाठी पुण्यात येत असले तरी ते ‘बोलणार’ नाहीत. त्यांच्या काही विधानांबाबत वाद निर्माण झाल्यानंतर त्यांना धमक्या देण्यात आल्या होत्या. पोलीस संरक्षणही पुरविण्यात आले होते. मात्र, ‘कधीही काहीही होऊ शकते’ असे सांगून पोलिसांनी त्यांना जाहीर कार्यक्रम तसेच ‘वादग्रस्त’ बोलणे टाळावे, अशा सूचना केल्या होत्या. त्याप्रमाणे नेमाडे यांनी अनेक कार्यक्रम रद्दही केले आहेत. फर्ग्युसन गौरवाच्या निमित्ताने नेमाडे यांच्याशी संवाद साधण्यासाठी ‘लोकमत’ प्रतिनिधींनी संपर्क साधला असता, ‘त्यांना बोलण्यास बंदी आहे,’ असे त्यांच्या कुटुंबीयांकडून सांगण्यात आले. याबाबत चौकशी केली असता मध्यंतरीच्या काळात पुण्यासह नागपूरमधील कार्यक्रमांमध्ये नेमाडे यांनी केलेली विधाने वादग्रस्त ठरल्याने त्यांना अनेक लोकांकडून धमक्या आल्या होत्या. यासंदर्भात पोलिसांकडे त्यांच्या कुटुंबीयांनी संपर्क साधल्यावर त्यांना संरक्षण पुरविण्यात आले. मात्र, तरीदेखील कधीही काही होऊ शकते. याकरिता त्यांनी जाहीर कार्यक्रम करणे टाळावे’ अशी सूचना पोलिसांनी केली होती. त्यानुसार नेमाडे यांनी अनेक जाहीर कार्यक्रम आपणहून रद्द केले. गेल्या काही महिन्यांमध्ये ते कोणत्याच जाहीर कार्यक्रमात दिसले नाहीत. जणू ते अज्ञातवासातच गेले होते, या माहितीला त्यांच्या मित्रमंडळींनीही दुजोरा दिला आहे. शनिवारी दीर्घ कालावधीनंतर नेमाडे पुण्यात येत आहेत. फर्ग्युसन महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी असलेले नेमाडे काही दिवसांपूर्वीच घडलेल्या आंबेडकरवादी विद्यार्थी आणि अभाविपचे कार्यकर्ते यांच्यातील वादाच्या पार्श्वभूमीवर काय बोलणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे. मात्र, फर्ग्युसनच्या आठवणी ते सांगणार असले तरी रूढार्थाने भाषण करणार नाहीत. माध्यमांशीही बोलणार नाहीत, असे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात आले. याबाबत पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांना विचारले असता पोलिसांनी नेमाडे यांना कोणत्याही स्वरूपात ‘बोलू नये’ असे सुचविले नसल्याचे त्यांनी सांगितले. दीर्घ कालावधीनंतर नेमाडे पुण्यात येत आहेत. फर्ग्युसन महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी असलेले नेमाडे काही दिवसांपूर्वीच घडलेल्या आंबेडकरवादी विद्यार्थी आणि अभाविपचे कार्यकर्ते यांच्यातील वादाच्या पार्श्वभूमीवर काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.
भालचंद्र नेमाडे यांचे ‘मौन’...
By admin | Published: April 02, 2016 3:41 AM