पुणे : वाहतूक पोलिसांनी एका महिलेची गाडी उचलली. त्याची चौकशी महिला पोलीस कर्मचाऱ्याकडे करून तिला अश्लील शिवीगाळ करून चप्पलने मारहाण करण्याचा प्रकार समोर आला. याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी एका महिलेला अटक केली आहे. सीता रमेश पुजारी (वय ३५, रा. ताडीवाला रोड) असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे.
याप्रकरणी विश्रामबाग वाहतूक विभागातील एका महिला पोलीस शिपायाने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. हा प्रकार अलका टॉकीजजवळील टिळक चौकात बुधवारी दुपारी दीड वाजता घडला.
अधिक माहितीनुसार, फिर्यादी या शासकीय कर्तव्य करीत असताना सीता पुजारी या टिळक चौकात आल्या. त्यांनी फिर्यादीजवळ येऊन माझी गाडी येथे का आणली, अशी विचारणा केली. त्यावर त्या म्हणाल्या, मला माहिती नाही, तुमची गाडी येथे का आणली आहे. मी या विभागाची नसून, तुम्ही शेजारील ट्रॅफिक ऑफिसमध्ये जाऊन चौकशी करा, असे सांगितले. त्यावर तिने तू पोलीस खात्यात असून तुला माहीत नाही का?, असे उद्धटपणे बोलून तिने पायातील चप्पल काढून फिर्यादीच्या पायावर, छातीवर मारहाण केली. या झटापटीत फिर्यादीच्या गणवेशाच्या पॅंटचे बटन तोडले. त्यांचे लाईनयार्ड बाहेर ओढले. डोक्यावरील केस ओढून अश्लील शिवीगाळ करून सरकारी कामात अडथळा आणला. पोलीस उपनिरीक्षक साळुंखे तपास करीत आहेत.