भामा आसखेड प्रकल्पग्रस्त शेतकरी आक्रमक; जलवाहिनीचे काम बंद पाडण्याचा पवित्रा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2020 07:06 PM2020-08-27T19:06:19+5:302020-08-27T19:07:14+5:30
जिल्हाधिकारी यांच्याशी झालेल्या बैठकीत कुठल्याही प्रकारचा सकारात्मक निर्णय होऊ शकला नाही...
चाकण : भामा आसखेड प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची आज ( दि.२७) जिल्हाधिकारी यांच्याशी झालेल्या बैठकीत सकारात्मक निर्णय होऊ शकला नसल्याने धरणग्रस्तांनी आसखेड खुर्द येथे जलवाहिनीचे सुरू असलेले काम बंद करण्यासाठी धाव घेतली आहे.
खेड तालुक्याचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या आश्वासनानंतर प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे सुरू असलेले उपोषण ( दि.२१ ) ला मागे घेतले होते.त्यानंतर जलवाहिनीचे काम वेगाने सुरू करण्यात आले होते. मोहिते पाटील यांच्या आश्वासनानुसार पालकमंत्री अजित पवार यांच्यासोबत प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती.परंतु पालकमंत्री हजर नसल्याने जिल्हाधिकारी यांच्याशी झालेल्या बैठकीत चर्चा होऊन कुठल्याही प्रकारचा सकारात्मक निर्णय होऊ शकला नाही. त्यामुळे प्रकल्पग्रस्त शेतकरी आक्रमक झाले.
जिल्हाधिकारी यांच्याशी झालेल्या बैठकीत ठोस निर्णय झाला नसल्याचे कळताच भामा आसखेड धरणग्रस्तशेतकरी जलवाहिनीचे काम सुरू असलेल्या ठिकाणी मोठ्या संख्येने जमा होऊन काम बंद करण्याचा प्रयत्न करण्यात आला असता अगदी निर्धास्त असलेल्या पोलिसांची यामुळे मोठी पळापळ झाली.तर अचानक मोठ्या संख्येने जमलेल्या शेतकऱ्यांना पाहून काम करणारे कामगारही गोंधळून गेले आहेत.मात्र पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे.