भामा-आसखेड पाणीपुरवठा योजना १ जानेवारी सुरु होणार; उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2020 08:21 PM2020-12-30T20:21:13+5:302020-12-30T20:21:44+5:30
अनेक अडचणींवर मात करीत व शासनाच्या २२ विभागांच्या मान्यतेनंतर ५८३ कोटी रूपयांचा हा प्रकल्प आजमितीला झाला पूर्ण
पुणे : शहराच्या पूर्व भागातील सुमारे १५ लाख लोकांना सुरळीत पाणीपुरवठा होण्यासाठी पुणे महापालिकेच्या ‘भामा-आसखेड पाणीपुरवठा प्रकल्पा’ चे लोकार्पण नववर्षाच्या पहिल्याच दिवशी होणार आहे. १ जानेवारी २०२१ रोजी या प्रकल्पाचा ऑनलाईन लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला असल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पत्रकार परिषदेत दिली.
महापालिकेच्या नवीन इमारतीतील श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात दुपारी चार वाजता या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. सोहळ्यास राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय पर्यावरण, वने व माहिती प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे , भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, खासदार गिरीश बापट उपस्थित राहणार आहेत. तसेच यावेळी जिल्ह्यातील सर्व खासदार, आमदार, माजी आमदार उपस्थित असतील.
कोरोना आपत्तीच्या पार्श्वभूमीवर सभागृहातील उपस्थिती मर्यादित ठेवण्यात आली असून, या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण महापालिकेच्या लॉनवर करण्यात येणार असल्याचेही महापौर मोहोळ यांनी सांगितले. यावेळी उपमहापौर सरस्वती शेंडगे, सभागृह नेते गणेश बिडकर, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांच्यासह सर्व गटनेते व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
सन २०१३ मध्ये मंजूर झालेल्या ‘भामा-आसखेड पाणीपुरवठा प्रकल्पा’ चे काम सन २०१४ मध्ये सुरू झाले. अनेक अडचणींवर मात करीत व शासनाच्या २२ विभागांच्या मान्यतेनंतर ५८३ कोटी रूपयांचा हा प्रकल्प आजमितीला पूर्ण झाला आहे. २०० दशलक्ष लिटर प्रति दिन पाणी या प्रकल्पामुळे शहराच्या पूर्व भागातील कळस, संगमवाडी, येरवडा, लोहगाव, धानोरी, वडगावशेरी या परिसरातील नागरिकांना मिळणार आहे. या प्रकल्पामुळे पुणे शहराला एक नवीन जलस्त्रोत जोडला गेला आहे.
-----------------------------------