पुणे : महागाईवर नियंत्रण ठेवण्यात अपयश आल्याचा ठपका ठेवत भारतीय मजदूर संघाच्यावतीने केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करण्यात आले. याची दखल घेतली नाही तर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.
संघाचे प्रदेशाध्यक्ष अनिल ढुमणे यावेळी उपस्थित होते. सामान्य माणसाचे जगणे महागाईमुळे अवघड झाले आहे. केंद्र व राज्य सरकारेही याला जबाबदार आहेत. भामसं ही देशातील सर्वाधिक सदस्य संख्या असलेली कामगार संघटना आहे. त्यामुळे याची दखल घ्यावी, महागाईवर नियंत्रण आणावे, अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा ढुमणे यांनी दिला.
पेट्रोल डिझेलच्या किमती कमी करा घरेलू, बांधकाम, फेरीवाले, रिक्षावाले, टॅक्सीचालक, माळी कामगार, पुजारी, भटजी, सोनार, कारागीर, शिंपी यासह असंघटित क्षेत्रातील कामगारांना राज्याने १० हजार रुपये अनुदान द्यावे, अशा मागण्यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी जयश्री कटारे यांना देण्यात आले. जालिंदर कांबळे, अजेंद्र जोशी, विवेक ठकार, नीलेश खरात, अर्जुन चव्हाण, बाळासाहेब भुजबळ, सचिन मेंगाळे तसेच विविध क्षेत्रातील भामसंचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.