पुणे : एका थाळीवर एक थाळी मोफत अशी शहरातील एका नामांकित हॉटेलची ऑफर असल्याचे भासवत एका सायबर चोरट्याने महिलेची २ लाखांची फसवणूक केल्याची घटना शुक्रवार पेठ परिसरात घडली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे चोरटा केरळचा असून तो पुण्यातील सुकांता हॉटेलच्या नावे ही मोफत थाळीची ऑफर देत होता.
याप्रकरणी, शुक्रवार पेठेत राहणाऱ्या ३८ वर्षीय महिलेने खडक पोलिसांना दिलेल्या फिर्यादीनुसार, सोशल मीडियावर थाळी ऑर्डर करण्यासाठी पाहिले असता सुकांता हॉटेलच्या नावे ‘एका थाळीवर एक थाळी फ्री’ अशी जाहिरात दिसली. संबंधित जाहिरातीत दिलेल्या मोबाइल क्रमांकावर फोन केला असता २५० रुपयांना एक थाळी आहे असे सांगण्यात आले. त्यानंतर जर क्रेडिट कार्डचा वापर करून थाळी घेतली तर आणखी ५० रुपये सवलत मिळेल असे सांगितले.
महिलेने क्रेडिट कार्ड वरून पेमेंट करणार असे सांगितल्यावर सायबर भामट्याने महिलेच्या मोबाइल क्रमांकावर एक लिंक पाठवली. लिंक डाउनलोड केल्यावर मोबाइलचा संपूर्ण ऍक्सेस त्या भामट्याला मिळाला. यानंतर त्या सायबर भामट्याने १ लाख ९९ हजार रुपये ट्रान्स्फर करून घेतल्याचे महिलेच्या लक्षात आले. याप्रकरणी सायबर पोलिसांनी तपासानंतर संबंधित आरोपी केरळमधील मुन्नार येथील रहिवासी असून प्रकाश कुमार असे त्या आरोपीचे नाव असल्याचे समोर आले. प्रकाशसह त्याच्या अन्य साथीदारांविरुद्ध खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक यादव करत आहेत.
ही घ्या काळजी..
- सोशल मीडियावरून ऑर्डर करताना कॅश ऑन डिलेव्हरी ला प्राधान्य द्या.- ऑनलाइन पेमेंट करताना कुठल्याही लिंकवर क्लिक करण्याची किंवा स्कॅन करण्याची गरज नसते.- अनोळखी मोबाइल नंबरवरून फोन आला अथवा केल्यास शक्यतो मराठी भाषेमध्ये बोला.