भंडारा दुर्घटनेतील दोषींना कडक शासन करणार, कुणाचाही मुलाहिजा ठेवणार नाही: अजित पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2021 01:04 PM2021-01-09T13:04:10+5:302021-01-09T13:27:13+5:30
भंडारा येथील घटना दु:खद आहे. ज्या हॉस्पिटलमध्ये नवबालक आहे त्या सर्व हॉस्पिटलचे ऑडिट करणार असल्याचे आदेश देण्यात आले आहे.
पुणे: भंडारा दुर्घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. दगावदेल्या मुलांच्या नातेवाईकांना ५ लाख रूपयांची मदत देण्यात येईल. विरोधकांकडून आरोप होत आहेत, त्यातले तथ्य तपासून पाहू. पण या दुर्घटनेतील दोषींना कडक शासन करणार असून कुणाचाही मुलाहिजा ठेवणार नाही, असे स्पष्ट मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले आहे.
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये आयोजित सभेला उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. या सभेनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पवार म्हणाले, भंडारा येथील घटना दु:खद आहे. ज्या हॉस्पिटलमध्ये नवबालक आहे त्या सर्व हॉस्पिटलचे ऑडिट करणार. सतत ऑन ड्यूटी कोणीतरी हवे. धक्कादायक आहे. वेदना होत आहेत. आईवडिलांना दु;ख सावरता यावे म्हणून प्रार्थना करतो. दोषींना कडक शासन करू मुलाहिजा ठेवणार नाही. जास्तीची माहिती घेत आहे.राजेश टोपेंना तिथे जायला सांगितले आहे.
भाजपाच्या कार्यकाळात हॉस्पिटलचे काम झाले अशी टीका होत आहे, याकडे लक्ष वेधले असता पवार म्हणाले, कोणाच्या कार्यकाळात काम झाले वगैरे गोष्टी गोण आहेत आत्ता. शनिवारी पहाटे २ ला ही दुर्घटना घडली आहे. त्याची चौकशी करतो आहोत. काही आरोप केले जात आहेत, त्याचीही चौकशी करणार आहोत.
कोणी काय वक्तव्य करावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. परंतु त्या ठिकाणी घडलेल्या घटनेची चौकशी करण्याचे आणि सर्व एन आय सी यु युनिट चे ऑडिट करण्याचे आदेश देण्यात आलेत. त्यानंतर यामध्ये नक्की काय घडलं हे समजू शकेल. परंतु त्यांनी जी माहिती दिलेली आहे त्यावरती नक्कीच विचार केला जाईल. मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आल्याचेही पवार यांनी स्पष्ट केले आहे.
शिवसेनेच्या महेश कोठे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशावर पवार म्हणाले...
पुढे पवार म्हणाले, महेश कोठे हे मागील सात-आठ महिन्यांपासून अस्वस्थ होते. वेगळी भूमिका घेण्याची त्यांची इच्छा होती. परंतु महाविकास आघाडीमध्ये असं ठरलेलं आहे की एकमेकांचे कार्यकर्ते फोडायचे नाहीत. महेश कोठे हे मला भेटलेले नाहीत त्यांच्याशी चर्चा केल्यानंतरच मी याबाबत काही सांगू शकेन.