पुणे : भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेच्या नियामक मंडळ आणि विश्वस्तांच्या कार्यकालामध्ये वाढ करण्यासाठी घटनादुरुस्तीच्या प्रक्रियेला वेग आला आहे.नियामक मंडळाचा कार्यकाल पाच वर्षे आणि विश्वस्तांचा सात वर्षे करण्यात येण्याच्या प्रस्तावावर विशेष सर्वसाधारण सभेमध्ये मतदान होणार आहे. मात्र, शंभर वर्षांपूर्वीची घटना बदलून शताब्दी वर्षानिमित्त करण्यात येत असलेल्या या घटनादुरुस्तीबाबत काही आजीव सभासदांनी नाराजी व्यक्त केली आहे.भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेच्या शताब्दी वर्षाची सांगता ६ जुलै रोजी झाली. शताब्दी वर्षानिमित्त संस्थेने अनेक नवीन प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत.नवीन प्रकल्प पूर्णत्वाला नेण्यासाठी नियामक मंडळ आणि विश्वस्तांना पुरेसा कालावधी मिळावा, यादृष्टीने नियामक मंडळाचा कार्यकाल तीन वर्षांवरून पाच वर्षे आणि विश्वस्तांचा कार्यकाल पाचवरून सात वर्षे करावा, असा प्रस्ताव वर्धापनदिनी झालेल्या सर्वसाधारण सभेत मांडण्यात आला होता.मात्र, संस्थेच्या घटनेनुसार या सभेस पुरेसे सदस्य उपस्थित नसल्याने हा प्रस्ताव मागे घेण्यात आला. मात्र, संस्थेच्या घटनेतील तरतुदीनुसार २५ सदस्यांनी लेखी निवेदन दिल्यास विशेष सर्वसाधारण सभा घेण्याची तरतूद घटनेमध्ये आहे. त्यानुसार, आता संस्थेच्या नियामक आणि कार्यकारी मंडळाच्या कार्यकालामध्ये वाढ करण्यासाठी शनिवारी (५ आॅगस्ट) विशेष सर्वसाधारण सभा होणार आहे. परंतू, शंभर वर्षांपूर्वीची घटना बदलून शताब्दी वर्षानिमित्त करण्यात येत असलेल्या या घटनादुरुस्तीबाबत काही आजीव सभासदांनी नाराजी व्यक्त केली आहे.दर तीन वर्षांनी २५ जागांसाठी निवडणूक -भांडारकर संस्थेच्या घटनेनुसार, दर तीन वर्षांनी नियामक मंडळाच्या २५ जागांसाठी निवडणूक घेतली जाते. या घटनेनुसार, शंभर वर्षे संस्थेची वाटचाल झालेली आहे. मात्र, शताब्दी वर्षात नव्याने निवडून आलेल्या नियामक मंडळाच्या सदस्यांना तीन वर्षांचा कालावधी अपुरा पडू लागल्याने तो पाच वर्षांचा करण्यात यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. संस्थेच्या वर्धापन दिनाच्या सर्वसाधारण सभेतच ही दुरुस्ती करून घेण्याचा प्रस्ताव फेटाळण्यात आला. त्यामुळे, आता शनिवारी होत असलेल्या विशेष सर्वसाधारण सभेमध्ये हा विषय मंजुरीसाठी येणार असल्याने संस्थेच्या आजीव सभासदांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. नियामक मंडळाचा कालावधी वाढवून घेण्यामागे सत्ता ताब्यात घेण्याचा हेतू सहजगत्या साध्य होत आहे, अशी माहिती संस्थेच्या आजीव सभासदांनी नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर दिली.शताब्दी वर्षानिमित्त भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेतर्फे अनेक नवीन प्रकल्प, योजना हाती घेण्यात आल्या आहेत. कोणताही प्रकल्प पूर्णत्वाला नेण्यासाठी किमान साडेतीन-चार वर्षांचा कालावधी लागतो. अशा परिस्थितीत तीन वर्षांनी नियामक मंडळ आणि पाच वर्षांनी विश्वस्त बदलल्यास नव्या सदस्यांना सर्व काम नव्याने हाती घ्यावे लागेल. त्यामुळे नियामक मंडळ आणि विश्वस्तांचा कालावधी अनुक्रमे पाच आणि सात वर्षे करण्याचा प्रस्ताव शनिवारी विशेष सर्वसाधारण सभेमध्ये मांडून घटनादुरुस्तीबाबत चर्चा केली जाणार आहे. नियामक मंडळ आणि विश्वस्त या दोघांचाही कार्यकाल पाच वर्षांचाच ठेवावा, अशी मागणी काही आजीव सदस्यांनी केली आहे. मात्र, प्रकल्प मार्गी लावण्याच्या दृष्टीने आणि संस्थेच्या प्रक्रियेनुसार, वास्तवात ते शक्य होणे अवघड आहे.-राहुल सोलापूरकर, विश्वस्त
भांडारकर संस्थेत घटना दुरुस्ती? ; विश्वस्तांच्या कार्यकालात वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2017 3:24 AM