पुणे : पुणे शहरातील भांडारकर रस्त्यावरील एका इमारतीत आग लागण्याची घटना घडली. दुपारी एकच्या दरम्यान याबद्दलची माहिती अग्निशमन दल नियंत्रण कक्षाला मिळाली. भांडारकर रस्त्यावरील करण सोहेल या सात मजली इमारतीत गच्चीवर पञा व स्लायडिंग अशा बांधकाम असलेल्या ऑफिसमध्ये आग लागल्याची माहिती मिळाली. त्यानंतर काही वेळातच अग्निशमन दलाची वाहने घटनास्थळी पोहचली.
घटनास्थळी गेल्यानंतर त्या इमारतीत कोणी अडकले नसल्याची खात्री जवानानी केली. त्यानंतर सातव्या मजल्यावर जात होज पाईपच्या साह्याने पाण्याचा मारा सुरू केल्या. त्यानंतर सुमारे वीस मिनिटात आग आटोक्यात आणली व सद्यस्थितीत कुलिंग ऑपरेशन सुरु आहे.
या घटनेत कोणीही जखमी वा जिवितहानी नाही. तसेच सदर इमारतीचा वापर हा व्यावसायिक असून अनेक ऑफिस आहेत. जवानांनी वेळेत आग विझवत इतरत्र पसरु न दिल्याने मोठा धोका टळला आहे. जवानांनी बऱ्याच कामगारांना या ठिकाणाहून बाहेर काढले. आगीचे कारण सद्यस्थितीत नेमके समजले नाही. सदर आगीवर अग्निशमन प्रमुख देवेंद्र पोटफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली अग्निशमन अधिकारी राजेश जगताप, गजानन पाथ्रुडकर व जवळपास २० जवान घटनास्थळी कार्यरत आहेत.