पुणे : कोरोना विषाणूच्या अनुषंगाने म्युकरमायकोसिस आजारांवरील औषधांचा पुरवठा आणि वितरण सुरळीतपणे करण्यासाठी तसेच काळा बाजार रोखण्यासाठी पुणे, पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण भागात १९ भरारी पथके नेमण्यात आली आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख दिली.
अन्न आणि औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त शाम प्रतापवर यांच्याकडे या १९ भरारी पथकाचे नियंत्रण देण्यात आले आहे. येणाऱ्या तक्रारीबाबत या पथकांनी प्रत्यक्ष भेट देऊन संबंधित मेडिकल/रुग्णालयात जाऊन तपासणी करायची आहे. म्युकरमायकोसिस या आजारांवरील औषधांची योग्य किमतीत विक्री होतेय का नाही, याची पडताळणी करायची आहे. कोणी गैरप्रकार अथवा काळा बाजार करत असेल तर त्यांच्यावर कठोर कारवाई करायची आहे. त्याचबरोबर रुग्णांना योग्य आणि वेळेत उपचार मिळण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी दिल्या आहेत.
स्थानिक पातळीवर कारवाईच्या अनुषंगाने काही अडचण आल्यास भरारी पथकाला स्थानिक पोलीस प्रशासन मनुष्यबळ पुरवणार आहे. यासाठी प्रत्येक गावातील तलाठी यांच्याकडेही जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच कार्यक्षेत्र निश्चित करण्यात आले आहे.