पुणे - पुण्यात भारत बंदला हिंसक वळण लागले आहे. या बंद दरम्यान कोथरुड डेपोमध्ये पीएमपी बस पेटवून देण्याची घटना पहाटे घडल्याची माहिती मिळत आहे. मनसेच्या कार्यकर्त्यांकडून याबाबतचे व्हिडीओ तातडीने व्हायरल केल्याने बंद पार्श्वभूमीवर ही बस पेटली नसून पेटविण्यात आल्याचे सांगितले जात आहे. पहाटे पाचच्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान कुमठेकर रोडवर मनसे कार्यकर्त्यांनी सकाळी सात वाजता एका पीएमपी बसवर दगडफेक करुन तिच्या काचा फोडल्याचं समोर आलं आहे.
बसचे चालक व वाहक यांनी दिलेल्या माहितीनुसार, वारजे ते चिंचवड ही बस पार्किंगमधून टेस्टींग करुन बाहेर आणली व हजेरी लावण्यासाठी पुन्हा डेपोमध्ये गेलो होतो. त्यादरम्यान रस्त्यावर असणाऱ्या बसने पेट घेतला. त्यात संपूर्ण बस जळून खाक झाली आहे.बसचा पुढील बॉनेटच्या बाजूचा भाग पेटला होता. बसला आग लागली तर ती अशा प्रकारे पेटत नाही़ त्यामुळे भारत बंदच्या पार्श्वभूमीवर कोणीतरी ती पेटवून दिली अशी शंका व्यक्त केली जात आहे.
अग्निशामक दलाला या घटनेची माहिती सकाळी 5 वाजून 10 मिनिटांनी मिळाली. त्यानंतर तातडीने गाडी घटनास्थळी जाऊन त्यांनी आग विझविली. पण तोपर्यंत संपूर्ण बस जळून खाक झाली होती. दरम्यान, कुमठेकर रोडवर सकाळी सात वाजता एका बसवर दगडफेक करुन काचा फोडण्यात आल्या. या दोन घटना वगळता आतापर्यंत शहरात शांतता असून सकाळी दूध व अन्य साहित्यांची विक्री करणारी दुकाने तसेच पीएमपी बस, रिक्षांची वाहतूक सुरू आहे़.