हैदराबादची कंपनी भारत बायोटेकच्या (Bharat Biotech) स्वदेशी कोरोना लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांचा निकाल हाती आला आहे. कोव्हॅक्सिन ही लस 81 टक्के परिणामकारक असल्याचे कंपनीने आणि आयसीएमआरने (Indian Council of Medical Research) जाहीर केले आहे. यामुळे या लसीबाबतचा संभ्रम दूर होण्यास मदत मिळणार आहे. (Bharat Biotech Ltd’s Covaxin showed to be 81% effective in protecting people from covid-19 in an early analysis of phase 3 trial data.)
सोमवारी ज्येष्ठ नागरिक आणि व्याधीग्रस्त नागरिकांच्या लसीकरणाला सुरुवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोव्हॅक्सिन लस घेतली, तर शरद पवारांनीही कोविशिल्ड लस घेतली की कोव्हॅक्सिन यावरुन सोशल मीडियावर दिवसभर तर्क-वितर्क लढवले जात होते. सोमवारी सामान्य नागरिकांनीही कोव्हॅक्सिनबाबत विचारणा केली. दोन्ही लसींची सुरक्षितता आणि परिणामकारकता मानवी चाचण्यांमध्ये सिध्द झाल्याने संभ्रम निर्माण होण्याचे कारण नाही, असे तज्ज्ञांकडून सांगण्यात आले आहे. यानंतर दोनच दिवसांनी कोव्हॅक्सिनचे निकाल हाती आले आहेत.
सध्या भारतात सिरमची कोविशिल्ड आणि भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन लसीला आपत्कालीन वापराला परवानगी मिळाली आहे. कोविशिल्ड लस महापालिका रुग्णालयांमध्ये तर कोव्हॅक्सिन लस जिल्हा रुग्णालयाकडे उपलब्ध आहे. मोदींनी कोव्हॅक्सिन लस घेतल्याने सोमवारी अनेक ज्येष्ठ नागरिकांनी महापालिका रुग्णालयांमध्येही त्याच लसीची मागणी केल्याचे समजते. सध्या कोविशिल्ड लसीचा साठा मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. दोन्ही लसी तितक्याच सुरक्षित असल्याचे सांगितले जात आहे.
कोव्हॅक्सिन ही लस भारत बायोटेक आणि आयसीएमआरने (ICMR) एकत्रितपणे विकसित केली होती. तिसऱ्या टप्प्य़ात 18 ते 98 वर्षे वयाच्या 25,800 लोकांवर चाचणी घेण्यात आली होती. भारत बायोटेकने ही लस 60 टक्के परिणामकारक असेल असे गृहित धरले होते. मात्र, मिळालेल्या माहितीनुसार सध्याचा आकडा हा अपेक्षेपेक्षा जास्त आहे. कोव्हॅक्सिनच्या आपत्कालीन वापरावेळी या लसीवरून वाद निर्माण झाला होता. यामुळे लोकांकडून सीरमच्या कोविशिल्डला मागणी होऊ लागली होती. भारत बायोटेकची ही लस ब्रिटनच्या नवीन कोरोना स्ट्रेनवरही कारगर ठरल्याचा दावा कंपनीने केला आहे.
सीरमला टाकले मागेAstraZeneca ची लस सीरम इन्स्टिट्यूटने उत्पादित केली आहे. ही लस 70 टक्के परिणामकारक आहे.