पुणे : रेल्वेचा प्रवास म्हणजे कमी दरात आणि सुरक्षित प्रवास म्हणून ओळखला जातो. याच उद्देशाने रेल्वे मंत्रालयाने सामान्य प्रवाशांसाठी धार्मिक स्थळांना भेट देणाऱ्या विविध यात्रांचे आयोजन केले आहे. यापैकी पुण्याहून जग्गनाथ पुरी, कोलकाता, गया, वाराणसी आणि प्रयागराज या महत्त्वाच्या स्थळांना पर्यटकांना भेट देता यावी यासाठी ‘भारत गौरव पर्यटक रेल्वे’ सुरू केली आहे. उद्या (२८ एप्रिल) सकाळी १० वाजता ही रेल्वे पुणे स्थानकावरून सुटणार आहे.
दरम्यान गुरूवारी सकाळी दहाच्या सुमारास भारत गौरव रेल्वे पुणे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर दाखल झाली. शुक्रवारी सकाळी ९ च्या सुमारास ही रेल्वे सुटण्याआधी विशेष समारंभाचे देखील आयोजन करण्यात आले असून, पुण्यातून सुरू होणारी ही पहिली ‘भारत गौरव यात्रा’ रेल्वे आहे. यासाठी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. ७५० प्रवासी या रेल्वेने ‘दिव्य काशी यात्रा’ करणार आहेत.
रेल्वे मंत्रालयाच्या ‘देखो अपना देश’ आणि ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ योजनेंतर्गत ही रेल्वे उद्या सोडण्यात येणार आहे. या प्रवासादरम्यान प्रवाशांना जगन्नाथ पुरी, कोलकाता, गया, वाराणसी आणि प्रयागराज या महत्त्वाच्या धार्मिक स्थळांना भेट देता येणार आहे. देशातील समृद्ध सांस्कृतिक आणि धार्मिक वारसा देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पर्यटकांना दाखवण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने ही विशेष रेल्वे सुरू केली आहे. रेल्वे मंत्रालय आणि आयआरसीटीसीच्या माध्यमातून ही सेवा दिली जाणार आहे.
सेल्फी, रील्ससाठी गर्दी..
दरम्यान गुरूवारी भारत गौरव रेल्वे पुणे स्थानकावर दाखल होताच, नवीन चकाचक रेल्वे बघून सेल्फी आणि रील्स करण्यासाठी एकच गर्दी जमा झाली होती. या रेल्वेच्या कोचला बाहेरून विविध प्राणी, पुरातन वास्तू, धार्मिक स्थळे, योगा, भारतीय नृत्यांचे प्रकार, पॅन्ट्री कारच्या बाहेर भारतीय मसाल्यांचे चित्र लावण्यात आल्याने, या रेल्वेची शोभा आणखीनच वाढली आहे.
रेल्वेतच मिळणार जेवण..
रेल्वे मंत्रालयाने एकीकडे सगळ्या रेल्वे गाड्यांमधील पॅन्ट्रीकार बंद केलेली असताना, भारत गौरव रेल्वेत मात्र अत्याधुनिक इलेक्ट्रिक पॅन्ट्रीकार देण्यात आली आहे. पुण्यातील रेल्वे प्रवासी संघटनेच्या अध्यक्षा हर्षा शहा यांनी सर्वज रेल्वे गाड्यांतील पॅन्ट्रीकार पुन्हा सुरू करा, आजपर्यंत पॅन्ट्रीकारमुळे एकाही रेल्वेत आग लागल्याची घटना संबंध देशभरात कधीही घडली नसल्याचे सांगत जर भारत गौरव रेल्वेत पॅन्ट्रीकार दिली जात असेल तर अन्य रेल्वेत प्रवासी प्रवास करत नाहीत का ? असा सवाल देखील यावेळी उपस्थित केला आहे.
‘भारत गौरव’ रेल्वेत या सुविधा मिळणार..
- स्थानिक स्थळांची माहिती मिळणार- सोबतीला गाइड असणार- मुक्कामाच्या ठिकाणी हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था- रेल्वेतच जेवणाची व्यवस्था- हॉटेल ते रेल्वे स्थानक आणि हॉटेल ते स्थानिक स्थळांसाठी वाहनाची सोय- पॅकेजमध्येच या सर्व बाबींचे शुल्क आकारले असल्याने, प्रवाशांना वेगळे शुल्क देण्याची गरज नाही.
प्रतिव्यक्ती दर..
- स्लीपर क्लास - १५ हजार ९००- वातानुकूलित तृतीय श्रेणी - २७ हजार ९००- वातानुकूलित द्वितीय श्रेणी - ३३ हजार ३००