पुणे : भारतीय रेल्वे २८ एप्रिल रोजी भारत गौरव पर्यटक रेल्वेद्वारे पुरी - गंगासागर दिव्य काशी यात्रा लाँच करणार आहे. पुण्याहून पुरी, कलकत्ता, गया, वाराणसी आणि प्रयागराज या महत्त्वाच्या धार्मिक स्थळांना भेट देण्यासाठी ९ रात्री, १० दिवसांची ही यात्रा असणार आहे. पर्यटकांना जगन्नाथ मंदिर, कोणार्क मंदिर, लिंगराज मंदिर, काली बारी, विष्णू पद मंदिर, काशी विश्वनाथ मंदिर इत्यादी विविध महत्त्वाच्या धार्मिक स्थळांना भेट देण्याची संधीही यादरम्यान मिळणार आहे.
आयआरसीटीसी ही सर्वसमावेशक टूर ऑफर करत आहे, ज्यात भारत गौरव रेल्वेच्या विशेष एलएचबी कोचमध्ये आरामदायी रेल्वे प्रवास, ऑन-बोर्ड आणि ऑफ-बोर्ड जेवण, रस्ता बदलून फिरणे, प्रेक्षणीय स्थळे आणि निवास व्यवस्था या बाबींचा समावेश असेल. या भारत गौरव रेल्वेत ७ स्लीपर क्लास कोच, ३ तृतीय वातानुकूलित आणि १ द्वितीय वातानुकूलित कोचच्या संरचनेसह, आयआरसीटीसी ७५० प्रवाशांसाठी ३ श्रेणींमध्ये टूर पॅकेज ऑफर करत आहे.
भारत सरकारच्या कल्पनेनुसार 'देखो अपना देश' आणि 'एक भारत श्रेष्ठ भारत' या पर्यटन संकल्पनांना चालना देण्याच्या उद्देशाने, आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताला एक गंतव्यस्थान म्हणून दाखवण्यासाठी रेल्वे मंत्रालय देशाच्या विविध भागांतून भारत गौरव पर्यटक रेल्वे चालवत आहे. २८ एप्रिल रोजी पुण्याहून पुरी – गंगासागर दिव्य काशी यात्रा सुरू करण्यासाठी भारतीय रेल्वेने पूर्ण तयारी केली असून, प्रवाशांनी या सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.