पुणे: चांदोमामाच्या घरी 'चंद्रयान३' ने पाऊल ठेवताच सर्व भारतीयांचा ऊर भरून आला. हा क्षण प्रत्येकजण आपल्या मनात साठवत होता आणि न्यू इंग्लिश स्कूलमध्ये 'भारत माता की जय...'अशी घोषणा देत विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष केला. सर्वांनी भारताचा जयजयकार करत हा आनंद व्यक्त केला. ढोल ताशाच्या गजरात आणि तिरंगा उंचावत विद्यार्थ्यांनी आनंद साजरा केला.
निमित्त होते 'चंद्रयान ३' चे चंद्रावर पाऊल ठेवण्याचे. इस्रो या भारतीय संस्थेने हे यान काही दिवसांपूर्वी चंद्रावरील संशोधनासाठी पाठवले होते. त्या यानाने आज सायंकाळी चंद्रावर आपले पाऊल ठेवले. हा थरारक आणि अभिमानास्पद क्षण पाहण्याची सोय टिळक रोडवरील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये करण्यात आली होती. येथील हजारो विद्यार्थ्यांनी हा सोहळा याची देही याची डोळा अनुभवला आणि जल्लोषही केला.
यावेळी विज्ञान शिक्षक, अभ्यासक व्ही. व्ही. रामदासी आणि पराग महाजनी यांनी तत्पूर्वी विद्यार्थ्यांना या यानाविषयी आणि चंद्राविषयी माहिती दिली. चंद्रयान ३ ज्या वेळी आकाशात झेपावणार होते, तो क्षण देखील येथील विद्यार्थ्यांनी असाच एकत्र बसून अनुभवला होता. त्यानंतर आज पुन्हा चंद्रावर यान पाऊल ठेवणार असल्याने तो क्षण देखील अनुभवण्याची इच्छा व्यक्त केली होती. ती आज सफल झाली. सर्वांच्या चेहऱ्यावर उत्सुकता आणि अभिमान पहायला मिळाला. या विद्यार्थ्यांनी स्कूल चले हम सारखी मून चले हम अशी घोषणा दिली. चंदा रे चंदा रे, कभी तो जमी पे आ, खोया खोया चांद अशा विविध गाणी लावून चंद्रावरील अभ्यासाची माहिती देण्यात आली. गॅलिलिओ याने १६१० मध्ये प्रथम चंद्राचा अभ्यास सुरू केला, तेव्हापासूनचा आजपर्यंतचा इतिहास उलगडण्यात आला.