पुणे : भरत नाट्य मंदिरच्या प्रशासनाने स्पॉट लाईटच्या शुल्कात केलेली वाढ आणि सलग शो घेतल्यास एका शो नंतर दुस-या शोसाठी 15 टक्क्यांची वाढ केली आहे. या दरवाढीचा फटका ’पुरूषोत्तम करंडक’ च्या महाअंतिम फेरीला बसणार आहे. मात्र, आयत्या वेळेला स्थळ बदलणे शक्य नसल्याने अंदाजे लाखभर रूपयांचा आर्थिक भुर्दंड सहन करून महाराष्ट्रीय कलोपासक संस्थेला ‘भरत’च मध्येच महाअंतिम फेरी घ्यावी लागणार आहे.
’भरत’च्या शुल्कवाढीच्या कारणास्तव राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाला आगामी नाट्य स्पर्धांसाठी स्थळ बदलणे भाग पडले. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून ‘पुरूषोत्तम’ आणि ‘भरत’ हे एक समीकरण झाल्याने आयत्या वेळी स्थळ बदलणे संस्थेला शक्य झाले नाही. त्यामुळे आर्थिक फटका सहन करूनच संस्थेला महाअंतिम फेरी ‘भरत’मध्येच पार पाडावी लागणार आहे.
महाराष्ट्रीय कलोपासकतर्फे आयोजित ’पुरुषोत्तम करंडक २०२२’ या आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पधेर्ची महाअंतिम फेरी येत्या २४ डिसेंबरपासून पुण्यात रंगणार आहे. पुण्यासह रत्नागिरी, कोल्हापूर, जळगाव-औरंगाबाद आणि अमरावती-नागपूर विभागातील १८ संघांमध्ये चुरस रंगेल. येत्या २४ ते २६ डिसेंबर या कालावधीत सकाळी ९ ते १ व सायंकाळी ५ ते ९ अशा दोन सत्रांमध्ये स्पर्धा होणार आहे. प्रत्येक सत्रात चार संघांचे सादरीकरण होणार आहे. तर, २६ डिसेंबरला सायंकाळच्या सत्रात बक्षीस वितरण समारंभ पार पडेल. पुणे व अमरावती-नागपूर विभागात सर्वोत्कृष्ट प्रायोगिक एकांकिकेचा करंडक कोणालाच न मिळाल्याने या विभागातून केवळ प्रथम तीन क्रमांकाचे संघ महाअंतिम फेरीसाठी पात्र ठरले आहेत. तर, रत्नागिरी, कोल्हापूर आणि जळगाव-औरंगाबाद विभागातून प्रत्येकी चार संघ महाअंतिम फेरीत दाखल झाले आहेत.
''भरत नाट्य मंदिरचे विश्वस्त रवींद्र खरे यांच्यासमवेत संस्थेची बैठक झाली. मात्र त्यांनी शुल्कात कोणतीही सवलत दिली नाही. स्पॉट लाईट आमचेच असतात. जे आम्ही विद्यार्थ्यांना फुकट उपलब्ध करून देतो. यातच महाअंतिम फेरीसाठी आम्हाला तीन दिवस नाट्यगृह बुक करावे लागते. आमचे सलग तीन शो असतात. त्यामुळे शुल्कवाढीचा सर्वात मोठा फटका संस्थेला बसणार आहे. जवळपास लाखभर रूपयांचे आर्थिक नुकसान बसण्याची शक्यता आहे. पुढील वर्षी स्थळाबाबत संस्था विचार करून निर्णय घेईल. - राजेंद्र ठाकूरदेसाई, चिटणीस, महाराष्ट्रीय कलोपासक''