पुणे : महात्मा जोतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांचा भारतरत्न पुरस्काराने गौरव व्हावा, यासाठी राज्य सरकार केंद्राकडे पाठपुरावा करेल, असे आश्वासन भाजपने जाहीरनाम्यात दिले आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न देण्याचा संकल्प अभिनंदनास्पद आहे. सावरकरांना भारतरत्न जाहीर झाल्यास तो ‘भारतरत्न’ या सन्मानाचा गौरव असेल, असे मत सावरकरप्रेमींकडून व्यक्त होत आहे. तर, संकल्पपत्रात या पुरस्काराबद्दलचा मुद्दा समाविष्ट करून भाजप मतांचे राजकारण करीत आहे, असाही मतप्रवाह व्यक्त होत आहे.ज्येष्ठ साहित्यिक शेषराव मोरे म्हणाले, ‘‘स्वातंत्र्यवीर सावरकर नव्या पिढीला समजण्याची नितांत गरज आहे. सावरकर यांच्यासारख्या क्रांतिकारक, महापुरुषाला आजवर काँग्रेस सरकारने बदनाम, कलंकित केले. सावरकर हे बुद्धिवादाचे प्रमाण आहे. त्यांचे राष्ट्रप्रेम, राष्ट्रनिष्ठा वादातीत आहे. आजवर सावरकरांवर अन्यायच झाला आहे.’’
अभिनेते शरद पोंक्षे म्हणाले, ‘‘स्वातंत्र्यवीर सावरकरांचे महत्त्व, राष्ट्रभक्ती वादातीत आहे. त्यांचा सन्मान झाल्यास तो ‘भारतरत्न’ या किताबाचाच सन्मान होईल. त्यामुळे संकल्पपत्रातून आश्वासन दिल्याबद्दल सरकारचे अभिनंदन. मात्र, २०१४पासून केंद्रात व राज्यात भाजपचे सरकार आहे. या कालावधीत अनेकांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित केले. एवढ्या वर्षांत सावरकरांच्या नावाचा विसर पडला का? आम्हाला निवडून दिले तर भारतरत्न देऊ, असे का म्हणायचे? भाजपा आश्वासनातून मतपेट्यांचे राजकारण करू पाहत आहे.’’अभिनेते योगेश सोमण म्हणाले, ‘‘संकल्पपत्रात या विषयाचा अंतर्भाव अभिनंदनीय आहे. भाजपा जाहीरनाम्यातील सर्व आश्वासने पूर्ण करण्याच्या दृष्टीने पावले उचलते. त्यामुळे राज्य सरकारकडून सावरकरांच्या नावाची भारतरत्नसाठी नक्कीच शिफारस केली जाईल.’’.........स्वातंत्र्यवीर सावरकर यांची दूरदृष्टी, त्यांचे विचार स्वीकारले असते, तर भारताने आज किती तरी पटींनी अधिक प्रगती केली असती. मात्र, दुर्दैवाने त्यांच्याकडे कायम दुर्लक्ष झाले आणि आजही होत आहे. आपण त्यांना एका विशिष्ट चौैकटीत बंदिस्त केले व ते आजवर उपेक्षितच राहिले. कोणताही सन्मान मिळावा म्हणून सावरकरांनी कधीच विचार केला नाही. भारतरत्न देऊन आपण किमान ही उपेक्षा कमी करू शकू. भाजप सरकारने संकल्पपत्रामध्ये सावरकर यांना भारतरत्न देण्याचे आश्वासन दिले, ही सकारात्मक बाब आहे. - मिलिंद रथकंठीवार , नियोजित अध्यक्ष, आंतरराष्ट्रीय सावरकर साहित्य संमेलन