पाटील-शहा परिवाराचे
पाटील-शहा परिवाराचे पुन्हा मनोमिलन?
इंदापूर : कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी भरत शहा यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यामुळे विरोधकांच्या गोटात चाललेल्या उलटसुलट चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. भरत शहा पुन्हा स्वगृही परतल्याचे मानले जात आहे. पाटील शहा परिवाराचे पुन्हा मनोमिलन झाल्याच्या चर्चेने जोर धरला आहे.
इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या सचिव पदाचे मुकुंद शहा यांच्या सहीचे अधिकार काढून घेतल्याने त्यांचे बंधू भरत शहा यांनी सर्व पदांचा राजीनामा दिला होता. तेव्हापासून पाटील-शहा परिवाराचे खटकले होते अशी चर्चा होती. मात्र, शंकरराव बाजीराव पाटील यांचे निकटवर्तीय आणि विश्वासू असणारे गोकुळदास (भाई) शहा यांचे पाटील कुटुंबासोबत खूप वर्षांपासून जिव्हाळ्याचे संबंध आहेत, तसेच हर्षवर्धन पाटील यांच्या राजकारणाच्या जडणघडणीमध्ये शहा कुटुंबाचा पूर्वीपासूनच मोठा वाटा आहे.
कारखान्याच्या संचालकपदाचा भरत शहा यांनी तडकाफडकी राजीनामा दिल्याने शहा यांच्या भूमिकेकडे संपूर्ण तालुक्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले होते. संपूर्ण तालुक्यात विविध तर्कवितर्क राजकीय वर्तुळात लढविले जात होते. मात्र, अखेरीस पाटील-शहा यांचा वाद, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती अप्पासाहेब जगदाळे यांनी केलेल्या योग्य शिष्टाईमुळे मिटला आहे.
राजकारणात अप्पासाहेब जगदाळे हे दिलेले शब्द पाळणारे नेते आहेत. हे सर्वांना परिचित आहे. जगदाळे यांनी शहा यांच्या घरी जाऊन, ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी शहा कुटुंबाने पुढे यावे अशी विनंती केल्याचे समजते. त्यानंतर भरत शहा यांनी शुक्रवारी ( दि.२४ ) कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्यासाठी नामनिर्देशन अर्जाच्या अखेरीस इंदापूर ऊस उत्पादक गटातून आपला उमेदवारी अर्ज दाखल करून विरोधकांना धक्का दिला आहे.
------------------------ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी अर्ज दाखल
कर्मयोगी कै. शंकरराव पाटील यांनी असंख्य अडचणीतून कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याची स्थापना केली. यामध्ये कारखान्याच्या स्थापनेपासून आमचे काका गोकुळशेठ शहा आजतागायत सोबत राहिले आहेत. राजकारण हा विषय वेगळा आहे. मात्र, ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी सहकारी साखर कारखानदारी अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. शेतकरी सभासदांचा उमेदवारी भरण्यासाठी मागील एक महिन्यापासूनचा आग्रह मी टाळू शकलो नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हितासाठी कायम काम करीत राहणार असल्याची ग्वाही भरत शहा यांनी उमेदवार अर्ज भरताना दिली.
फोटो ओळी : इंदापूर येथे उमेदवारी अर्ज दाखल करताना भरत शहा.
२४०९२०२१-बारामती-०६
-----------------------------------