यवत: भरतगाव (ता. दौंड) ग्रामपंचायत वर राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत भैरवनाथ ग्रामविकास पॅनलने विजय मिळविला असून ९ पैकी थोरात गटाचे ५ तर कुल गटाचे ४ उमेदवार निवडणुकीत विजयी झाले आहेत. सलग चौथ्या पंचवार्षिक निवडणुकीत थोरात गटाने येथे विजय मिळविला आहे.
मागील पंचवार्षिक निवडणुकीत देखील थोरात गटाने भरतगावमध्ये बहुमत मिळविले होते. मात्र ग्रामपंचायत कारभारात अनेक राजकीय घडामोडींनंतर तत्कालीन सरपंच रेखा जाधव यांना सरपंचपद गमवावे लागले होते. कुल गटाचे विलास जगदाळे यांना त्यावेळी उपसरपंच पद मिळाले होते तर विकास हाके यांच्याकडे काही काळासाठी सरपंचपदाची जबाबदारी आली होती.
यंदाच्या निवडणुकीत थोरात गटाने परत मोर्चेबांधणी करत ग्रामपंचायतीवर बहुमत मिळविले. भाजपचे माजी तालुकाध्यक्ष राहिलेले तात्यासाहेब ताम्हाणे यांनी निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी मध्ये प्रवेश केला होता. यामुळे निवडणुकीच्या निकालाकडे सगळ्यांचे लक्ष होते.
वार्ड क्रमांक १ मध्ये सलग चौथ्या वेळेस कुल गटाचे माजी उपसरपंच विलास जगदाळे प्रतिष्ठा पणाला लागली होती.या वार्डात तीन पॅनलमध्ये तिरंगी लढत होती मात्र जगदाळे यांनी प्रतिष्ठा जपत विरोधी गटाला धोबीपछाड देत वार्डात परत एकदा विजय मिळविला. तीनही जागांवर त्यांचे उमेदवार विजयी केले. येथे साधना विलास जगदाळे, अजित जिजाबा थोरात व अक्षय अनंता ताम्हाणे हे विजयी झाले.
वार्ड क्रमांक २ मध्ये देखील निवडणुकीत चुरस होती. येथील तीनपैकी एका जागेवर कुल गट तर दोन जागांवर थोरात गटाच्या उमेदवारांनी विजय मिळविला. कुल गटाच्या उत्तम किसन टेमगिरे तर थोरात गटाच्या मनीषा सुभाष टेमगिरे, नीलम रवींद्र इंगळे हे उमेदवार विजयी झाले.
वार्ड क्रमांक ३ मध्ये राष्ट्रवादीच्या पूजा किसन हाके या बिनविरोध निवडून आलेल्या होत्या. तर दोन जागांसाठी झालेल्या निवडणुकीत दोन्ही जागांवर थोरात गटाच्या उमेदवारांनी विजय मिळविल्याने ग्रामपंचायतीवर थोरात गटाच्या सत्तेचे शिक्कामोर्तब झाले.थोरात गटाच्या सुप्रिया सावळाराम हाके व शंकर बाळासो जगदाळे यांनी विजय मिळविला.
पंचायत समिती गणातील तीनही गावात थोरात गटाची सत्ता
यवत पंचायत समिती गणात असलेल्या यवत, कासुर्डी व भरतगाव या तिन्ही ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत थोरात गटाने बाजी मारली असून येथे राष्ट्रवादीची सत्ता आली आहे. यामुळे या महत्त्वाच्या पंचायत समिती गणात कुल गटाला पराभवाला सामोरे जावे लागले असले तरी तीनही ग्रामपंचायतींमध्ये प्रत्येकी केवळ एक जागा थोरात गटाची जास्त असल्याने काठावरचे बहुमत मिळाले आहे.
२३ यवत
विजयी उमेदवारांसह जल्लोष साजरा करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते.