धनकवडी: कौटुंबिक कलहामुळे राहत्या घरी ओढणीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्येच्या प्रयत्नात असलेल्या तरुणाचे मन परिवर्तन करण्यात भारती विद्यापीठ पोलिसांना गुरुवारी यश आले. पोलिसांनी अवघ्या पाच मिनिटांत घटनास्थळी धाव घेतल्याने त्याचे प्राण वाचू शकल्याची माहिती स्थानिक रहिवाशांनी दिली.
भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत बीट मार्शल ब्रह्मनंद केंद्रे व नानासो खाडे हे गुरुवारी रात्री गस्त घालीत होते. त्याच वेळी बीट मार्शल ब्रह्ननंद केंद्रे यांना बिनतारी संदेश यंत्रणेवर एक तरुण आत्महत्या करत असल्याचा कॉल आंबेगाव येथील सिंहगड कॅम्पस येथून मिळाला. ही माहिती मिळताच क्षणाचाही विलंब न करता बिट मार्शल केंद्रे आणि खाडे यांनी या कॉलची तत्काळ दखल घेऊन अवघ्या पाच मिनिटांमध्ये घटना स्थळी धाव घेतली. याठिकाणी आपल्याच सदनिकेमध्ये एक तरुण खुर्चीवर उभे राहून साडीचा साह्याने गळफास घेत होता.
अंमलदार केंद्रे यांनी तात्काळ सदर तरुणास खाली घेतले त्यानंतर सदर तरुणाला समजावून सांगून त्याचे मनपरिवर्तन केले. आंबेगाव पठार मार्शल यांनी केलेल्या तात्काळ कार्यवाही मुळे एका तरुणाचा जीव वाचण्यास मदत झाली तसेच आत्महत्या करण्यापासून तिचे मनही परिवर्तन केल्याने पोलीस कर्मचारी ब्रह्मनंद खाडे व नानासो या दोघांचेही वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांनी कौतुक करून अभिनंदन केले.