पुणे : भरदिवसा महावितरण कर्मचार्यांच्या डोळयात मिरचीपूड टाकून रोकड लाबंविण्याच्या प्रकरणाचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. एटीपी मशीनचा ऑपरेटरच या कटाचा मुख्य सुत्रधार असल्याचे उघड झाले असून त्याच्यासह चौघांना अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्यांना १५ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. निलायम टॉकीज समोरील अजंठा लॉज समोर शुक्रवारी हा प्रकार घडला होता. मंगेश प्रभाकर बडसकर (वय २३ रा. वाघजाई मंदिराजवळ,जनता वसाहत), प्रविण शामराम शिंगे (वय २२ रा. शेळकेनगर, कोंढवा) असे अटक केलेल्यांची नावे असून त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. धिरज दत्तोबा रानवडे (वय २० रा. दांडेकर पुल), महेश सुरेश जांभुळकर (वय २१ रा. दांडेकर पुल) यांना अद्याप अटक झालेली नाही.याप्रकरणी अविनाश नामदेव चव्हाण याने फिर्याद दिली होती. एमएसईबीच्या निलायम टॉकीज जवळील एटीपी मशीनमधील कॅश जमा करण्याचे काम फिर्यादी चव्हाण कडे होते तर प्रविण शिंगे हा मशिनचा ऑपरेटर आहे. शुक्रवारी नेहमी प्रमाणे दोघांनी २ लाख ३३ हजार रुपयाची कॅश व विविध बँकेचे ५३ चेकचा भरणा करण्यासाठी दुचाकीवरुन निघाले होते. दुचाकीवरुन आलेल्या तिघा-चौंघानी त्यांना अडवून दोघांच्या डोळ्यात मिरचीपूड टाकून पैशाची बॅग जबरदस्तीने हिसकावून पोबारा केला होता. याप्रकरणात शिंगे हा जखमी झाला होता. पोलिसांनी या प्रकरणांचा तपास करुन एटीपी मशीनचा ऑपरेटरच याचा मुख्य सुत्राधार असल्याची माहिती मिळवली. त्यानुसार त्याला ताब्यात घेऊन तपास केले असता, आपल्या तीन मित्रांच्या मदतीने हा कट रचल्याचे त्याने कबुल केले. दत्तवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संभाजी निबांळकर यांच्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप देशमाने, कर्मचारी सचिन ढवळे, प्रमोद कळमकर, संजय भेगडे, तानाजी निकम आदींनी ही कारवाई केली.
भरदिवसा रोकड लांबविण्याचा कर्मचार्यानेच केला बनाव आरोपींना पोलीस कोठडी : महावितरणचा ऑपरेटर मुख्य सूत्रधार
By admin | Published: May 13, 2014 8:18 PM