बारामती: उत्पन्नापेक्षा जास्त मालमत्ता आढळून आल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केलेल्या नगररचनाकार सह संचालक हनुमंत नाझीरकर यांचा मुलगा भास्कर नाझीरकर याला बारामती तालुका पोलिसांनी फसवणूक प्रकरणी अटक केली. त्याला आज बारामती न्यायालयात हजर केले असताना न्यायालयाने अधिक तपासासाठी चार दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली, अशी माहिती बारामती तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीखक महेश ढवाण यांनी दिली.
पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने खेड शिवापूर टोलनाक्यावरुन शनिवारी रात्री भास्कर नाझीरकर याला ताब्यात घेऊन बारामती तालुका पोलिसांच्या हवाली केले. जिल्हा सत्र न्यायालय व उच्च न्यायालयाने भास्कर नाझीरकर याचा जामीन अर्ज फेटाळला होता. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली. बनावट नोटरी व भाडेपट्टा तयार करत त्याचा न्यायालयीन कामासाठी वापर केल्याप्रकरणी हनुमंत नाझीरकर यांची मुलगी गीतांजली हनुमंत नाझीरकर, मुलगा भास्कर हनुमंत नाझीरकर (रा. कोथरुड, पुणे) व हेमंत प्रल्हाद पोंदकुले या तिघांविरोधात बारामती तालुका पोलिस ठाण्यात २०२० मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. याबाबत संग्राम तानाजी सोरटे (रा. मगरवाडी, ता. बारामती) यांनी फिर्याद दिली. ९ डिसेंबर २०१९ ते २६ जून २०२० या कालावधीत बारामतीत विद्युत मंडळाच्या कार्यालयात ही घटना घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
फिर्यादी व त्यांचा भाऊ प्रवीण यांच्या नावे बनावट नोटरी भाडे करार व भाडेपट्टा तयार करत ती खरी आहेत. असे भासवून नाझीरकर व पोंदकुले यांनी ती कागदपत्रे बारामतीतील विद्युत मंडळ कार्यालयात दाखल केली. विद्युत पुरवठा कायम राहावा म्हणून त्यासाठी त्याचा वापर करण्यात आला. प्रवीण यांच्या नावे बनावट भाडेपट्टा तयार करत विद्युत मंडळाविरुद्ध मनाई मिळावी यासाठी तो बारामती न्यायालयात वापरण्यात आला होता. याप्रकरणी तिघांविरोधात भादंवि कलम ४६७, ४७१, ४७४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणात न्यायालयाने गीतांजली नाझीरकर हिला अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे़ पोलिस निरीक्षक महेश ढवाण अधिक तपास करत आहेत.