भोर : या वर्षी नीरा-देवघर व भाटघर ही धरणे १०० टक्के भरली होती. मात्र, मागील ४ महिन्यांपासून धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यामुळे भाटघर धरणात ४२ टक्के, तर नीरा-देवघर धरणात ३६ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत धरणातील ३० टक्के पाणीसाठा कमी झाला आहे. अद्याप उन्हाळ्याला ३ महिने शिल्लक आहेत. तोपर्यंत पाण्याचा विसर्ग असाच कायम राहिल्यास दोन्ही धरणांतील पाणीसाठा कमी होऊन धरण परिसरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे पाण्याचे योग्य नियोजन करावे लागेल.
आक्टोबर महिन्यात पाऊस थांबला आणि लगेच नोव्हेंबर महिन्यापासून भाटघर धरणातून मागील दोन महिने १,८०० क्युसेक्सने पाण्याचा विर्सग सुरू आहे. धरणात सध्या ४२ टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षी धरणात ७० टक्के पाणीसाठा होता. नीरा-देवघर धरणात या घडीला ३६ टक्के पाणीसाठा असून गेल्या वर्षी ५३ टक्के होता. मागील वर्षीच्या तुलनेत दोन्ही धरणांत ३० टक्के पाणीसाठा कमी आहे. सध्या दोन्ही धरणांतील पाणी सोडणे बंद करण्यात आले आहे. भोर तालुक्यातील कालवे अपूर्ण असून त्यातून मोठ्या प्रमाणात गळगी होत आहे. त्यामुळे दोन्ही धरणांतील पाणी नदीतून खाली जाते. भोरच्या पाण्यावर खालील भागातील बागायती शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवला जातो. मात्र, दर वर्षी भाटघर धरणातील २४ टीएमसी नीरा-देवघर धरणातील १२ व चापेट गुंजवणी धरणातील ४ असे एकूण ३८ टीएमसी पाणी दर पावसाळयात साठवले जाते. उन्हाळा आली, की धरणेरिकामी होतात. यामुळे येथील स्थानिकांना मार्च महिन्यापासून पाणीटंचाईचा सामना करावा लागतो.
भाटघर धरण ब्रिटिशकाळात बांधले गेले. त्यामुळे धरणाला तालुक्यासाठी कालवे नसतील. मात्र, नीरा-देवघर धरण होऊन १५ वर्षे झाली; पण अद्याप नीरा-देवघर धरणाचा उजवा कालवा अपूर्ण, तर डावा कालवा कागदावरच राहिला आहे. त्यामुळे नीरा नदीतून सोयीस्करपणे पाणी खाली जात असून येथील स्थानिकांना पाण्याकडे बघण्याशिवाय कोणताच पर्याय राहिलेला नाही. त्यामुळे उद्योग-व्यवसाय नसलेल्या तरुणांचे बागायती शेती करून उदरनिर्वाह करण्याचे स्वप्न हे स्वप्नच राहते की काय, अशीच अवस्था निर्माण झाली आहे. यामुळे अनेक तरुण शिक्षण अर्धवट सोडून पुण्या-मुंबईला जाऊन हॉटेलात, हमाली, दुकानात मिळेल ते काम करून आपला उदरनिर्वाह भागवतात.
धरण उशाला, कोरड घशालाभोर तालुक्यातील दोन्ही धरणे पावसाळ्यात १०० टक्के भरतात. उन्हाळ्यात ही धरणे तळ गाठतात. त्यामुळे दर वर्षी उन्हाळ्यात स्थानिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. यामुळे येथील लोकांची अवस्था ‘धरण उशाला आणी कोरड घशाला’ अशी झाली आहे. या दोन्ही धरणांच्या पाण्यावर तयार होणारी वीजही स्थानिकांना मिळत नाही.भामा-आसखेड धरणसाठा निम्म्यावरआसखेड : यंदा परतीच्या पावसाने दडी मारल्यामुळे धरण लाभ क्षेत्रातील शेती व पिण्याच्या पाण्यासाठी दोन महिने आधीच भामा आसखेड धरणातून पाणी सोडावे लागले. त्यामुळे यावर्षी धरणसाठ्यात गेल्यावर्षीच्या गतवर्षीच्या तुलनेत २१ टक्के पाणी कमी झाले ५७.५७ टक्के पाणीसाठा राहिला असल्याची माहिती धरण प्रशासनाचे भारत बेंद्रे यांनी दिली.गेल्यावर्षी फेब्रुवारी अखेर धरणात ७८.६५ टक्के पाणीसाठा होता. यावर्षी ५७.५७ टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे धरणातील पाणीकमी होत असल्यामुळे नदीकाठच्या नागरिकांची व गावांची पाण्यासाठी पायपीट होणार आहे. भामाआसखेड धरण खेड, शिरूर, दौंड तालुक्याच्या नागरिकांना तसेच चाकण औद्योगिक वसाहतीसाठी वरदान ठरले आहे. परंतु, यंदाचा वाढता उन्हाळा व कमी पाऊस यामुळे यंदाच्या उन्हाळ्याच्या झळा व पाणीटंचाई असे दुहेरी संकट तीनही तालुक्याला सहन करावे लागणार आहे. गतवर्षी धरण क्षेत्रात झालेल्या १ हजार २९२ मिलीमिटर पावसामुळे फेब्रुवारी अखेर ७८.६५ टक्के पाणीसाठा धरणात होता तर यंदा फक्त ७७५ मिलिमिटर पावसानंतर आजअखेर ५७.५७ टक्केच पाणीसाठा धरणात आहे. त्यात बाष्पीभवनाचाही परिणाम पाणीसाठ्यावर होणार आहे.गतवर्षी एकूण पाणीसाठा १८४.२८८ दलघमी पैकी उपयुक्तसाठा १७०.७६६ दलघमी आहे तर यंदा एकूण पाणीसाठा १३८.५२ दलघमी व उपयुक्त साठा फक्त १२४.९९४ दलघमी इतका आहे.