नीरा : नीरा नदीच्या खोऱ्यामध्ये असलेल्या भाटघर, नीरा देवघर तसेच वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये गेल्या महिनाभरापासून सुरु असलेल्या मध्यम स्वरुपाच्या पावसाच्या जोरावर भाटघर, नीरा देवघर ही धरणे शंभर टक्के भरली आहेत. भाटघर धरणामधून नीरा नदीत पाण्याचा विसर्ग सुरु असल्याने मंगळवारपर्यंत वीर धरण १00 टक्के भरले.गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पावसाने वेळेत हजेरी लावली होती. मात्र, महिन्यापासून सर्वत्र पावसाने दडी मारली आहे. भाटघर, नीरादेवघर, वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मध्यम स्वरुपाचा पाऊस पडत असल्याने ही धरणे भरली आहेत. भाटघर धरणाची क्षमता २३.७५० टीएमसी असुन हे धरण शंभर टक्के भरले. या धरणामधून ३ हजार क्युसेकने पाणी नदीपात्रात सोडण्यात आले आहे. या धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये आजवर ४९८ मिलीमीटर पाऊस झाला आहे. निरादेवघर धरणाची क्षमता ११.९१ टीएमसी असून पूर्ण क्षमतेने भरले आहे. या धरणातून ३००० क्युसेसने पाणी सोडण्यात आले आहे. तर या धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये १५९२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.वीर धरणाची क्षमता ९.८१५ टीएमसी असून आज अखेर शंभर टक्के पाणीसाठा या धरणात झाला असून या धरणाच्या पाणलोट क्षेत्रामधे २४० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. ही धरणे भरली असल्याने पुणे, सातारा, सोलापूर या तीन जिल्हयातील शेतक-यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पावसाचा जोर राहिल्याने तसेच पाणलोट क्षेत्रात विसर्ग सुरू राहिल्याने वीर धरणामधून देखील नीरा नदीमध्ये संध्याकाळी साडेसह वाजण्याच्या सुमारास ४६३७ क्युसेक वेगाने विसर्ग करण्यात आला.ब्रिटिशकालीन असलेल्या भाटघर धरणाला एकूण ८१ दरवाजे असून यापैकी ४५ दरवाजे हे स्वयंचलित आहेत. सध्या धरण्याच्या १७ स्वयंचलित धरणामधून नीरा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग होत आहे. तर वीर धरणाच्या एक दरवाजा चार फुटांनी उचलण्यातआला आहे.पावसाने दिलेली साथ आणि ंंभाटघर धरणामधून सुरु असलेला विसर्ग यामुळे शेतकरी आनंदला आहे. नदीपात्रामध्ये पाणी सोडण्यात येऊ लागल्याने शेतक-यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. शेतक-यांना आता शेतीचे नियोजन करता येणार आहे. पावसाचा जोर पुढील काही दिवस असाच सुरु राहीला तर शेतक-यांना त्याचा निश्चितच फायदा होणार असल्याचे स्थानिक ग्रामस्थांनी सांगितले.
भाटघर, नीरा देवघर १०० टक्के, वीरमधून विसर्ग सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2018 12:32 AM