भोर: तालुक्यातील ब्रिटिशकालीन भाटघर धरण शुक्रवारी १०० टक्के भरले. त्यामुळे धरणाच्या १३ स्वयंचलित दरवाजातून ७ हजार २०० क्युसेकने पाण्याचा विसर्ग नीरा नदीत सोडण्यात आला. यामुळे नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली असून पाटबंधारे विभागाने नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
भोर तालुक्यात मागील आठ दिवासांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे शुक्रवारी दुपारी भाटघर धरण १०० टक्के भरले. धरणात २४ टीएमसी पाणीसाठा झाला असून धरणाच्या ४५ स्वयंचलित दरवाजांपैकी १३ दरवाजातून सुमारे ७ हजार २०० क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरु केला आहे. गतवर्षी भाटघर धरण १२ सप्टेंबरला भरले होते. यावेळी एक महिना अगोदर धरण भरले आहे. भाटघर धरण भरल्याने धरणाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या ३ जिल्ह्यातील ९ तालुक्यातील २ लाख ५० हजार क्षेत्र ओलिताखाली येते. धरण भरल्याने पूर्वेकडील नागरिकांची पिण्याच्या पाण्याची आणि शेतीच्या पाण्याची चिंता मिटली आहे.
भाटघर धरणातून ७ हजार २०० तर नीरा देवघर धरणाच्या पावर हाऊस मधून ७०० क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरु आहे. त्यामुळे नीरा नदीची पाणी पातळी वाढली आहे. पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र धोडपकर यांनी नदीकाठावरील गावांना सावधानतेचा इशारा दिला आहे.