पुणे: यंदाच्या नवरात्रोत्सवात व दसऱ्याला झेंडूच्या फुलांची मार्केटयार्ड बाजारात आवक मोठ्या प्रमाणात होत आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा फुलांच्या भावात वाढ झाली आहे. दसऱ्याला मागील वर्षी आवक जास्त झालेल्या फुलांचे भाव कमी झाले होते. मात्र यंदा फुलांची आवक साधारण असली तरी दसऱ्यानिमित्त झेंडूच्या फुलांनी यंदा भाव खाल्ला आहे. झेंडू ८० ते १०० रुपये प्रतिकिलो भाव झाला आहे. तसेच फुलांचा हारांच्या किमतीत वाढ झाली होती. या वाढलेल्या दराचा फायदा शेतकऱ्यांबरोबर फूलविक्रेत्यांना होत असल्याचे चित्र आहे. यामुळे फूल उत्पादक शेतकऱ्यांनी योग्य भाव मिळत असल्याने समाधान व्यक्त केले आहे.
साडेतीन मुहूर्तांपैकी एक दिवस म्हणजे दसरा. या सणाला झेंडूच्या फुलांचा आणि आपट्याच्या पानांचा एक वेगळा मान असतो. त्यामुळे यंदाही दसऱ्याच्या निमित्ताने बाजारात झेंडूची फुले आणि आपट्याची पाने मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी आली होती. मात्र यंदा दसऱ्यानिमित्त झेंडूच्या फुलांचा भाव खाल्ला असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
दरवाढीचे अशी आहेत कारणे :
- यंदा पावसामुळे फुलांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.- फूल उत्पादक शेतकऱ्यांना वाहतूक दळणवळण खर्च परवडत नाही.- फूल उत्पादक शेतकऱ्यांना खर्च निघत नसल्याने यंदा दर वाढला
मागील वर्षी मार्केटयार्ड फूल आवारात मोठ्या प्रमाणात फुलांची आवक झाल्याने दर कमी मिळाले तर काही शेतकऱ्यांंना रस्त्यावर फुलं टाकून द्यावी लागली. यामुळे शेतकऱ्यांनी बाजारात फुलांची आवक कमी झाली. यामुळे यंदा फुलांच्या दरात वाढ झाली आहे.
झेंडू फुलांनी भाव खाल्ला जोड
मार्केटयार्ड फूल बाजारात गुरुवारपासून फुलांची आवक होण्यास सुरुवात झाली आहे. गुरुवारी साधारण झेंडूची १०५ टन आवक झाली असून, दर ५० ते १०० प्रतिकिलो रुपये आहे. शनिवारी दसरा असल्याने शुक्रवारी रात्री मोठ्या प्रमाणात आवक होण्याची शक्यता आहे. सध्या हिंगोली, सोलापूर, साताऱ्यासह कर्नाटकातून ही बाजारात फुले येत असतात. यंदा मात्र भावात वाढ झाली असून, ४० टक्केच आवक झाली आहे. -दादा कंद, फूल बाजार प्रमुख, मार्केटयार्ड
दसऱ्याला घरातील सर्व प्रकारच्या वस्तूची पूजा केली जाते आणि घराची सजावट करण्यासाठी फुलांची आवश्यकता असते. मात्र, यंदा मागील वर्षीच्या तुलनेत झेंडूच्या फुलात वाढ झाली असली तर देवीच्या पूजेसाठी फूल खरेदी करण्यासाठी ग्राहकांची पसंती असते. -अण्णा कदम, विक्रेते व्यापारी
झेंडूच्या फुलांची आवक सुरू आहे. मात्र, मागील वर्षी दसऱ्याला फुलांची आवक मोठी होती. यामुळे दर कमी होती. मात्र, यंदा फुलांची ४० ते ५० टक्केच आवक झाल्याने यंदा झेंडू, शेवंती, गुलछडी, गुलाब फुलांचे दर वाढले. त्यात चांगल्या प्रतीच्या फुलांना चांगला भाव मिळत असल्याने यंदा शेतकरी समाधान आहे. -सागर भोसले, फूल व्यापारी आडते, मार्केटयार्ड
यंदा फुलांना चांगला भाव मिळत आहे. मागील वर्षी फूल लागवड जास्त झाली होती. त्यात पावसामुळे फुलांचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे फुलांचे दर घसरले होते. मागील वर्षी झेंडूला १० ते २५ रुपये भाव मिळाला होता. तर शेतकऱ्यांना रस्त्यावर फुले फेकून देण्याची वेळ आली होती. यंदा गणपतीतही फुलांना चांगला भाव मिळाला असून, दसऱ्याला झेंडूला चांगला भाव मिळत असल्याने फूल उत्पादक शेतकरी समाधानी आहेत. -दीपक तरडे, शेतकरी, वाई (सातारा)
दसऱ्याला झेंडूला दुप्पट भाव
मागील वर्षी अक्षरश: शेतकऱ्यांना फुले रस्त्यावर फेकून द्यावी लागली होती. झेंडू फुलांना १० ते २५ रुपये प्रतिकिलो विक्री झाली तर काही शेतकऱ्यांचा खर्चही निघाला नाही. यामुळे शेतकऱ्यांनी फुलांची लागवड कमी केली. यामुळे यंदा दसऱ्याला फुलांची आवक कमी झाल्याने फुलांनी भाव खाल्ला आहे. झेंडूला यंदा दुप्पट भाव मिळाला असून, ५० ते १२० रुपये भाव मिळत आहे. यावर्षी गौरी-गणपतीतही फुलांना भाव मिळाला असल्याने दसऱ्यालाही चांगला भाव मिळाला आहे.