बारामती : बारामती तालुका पोलिसांना बनावट रेमडेसिविर बनविणारी टोळीची पाळेमुळे शोधुन काढण्यात यश आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी भवानीनगर (ता.इंदापुर) येथील डॉक्टरला गजाआड केले आहे. या रॅकेटमध्ये डॉक्टरचाही सहभाग निष्पन्न झाल्याने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. तो डॉक्टर सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात आता भवानीनगर (ता. इंदापूर) येथील डॉ. स्वप्निल अंकुश नरुटे (वय २९, रा. काझड, ता. इंदापूर) याला पोलिसांनी अटक केली आहे. तो या टोळीकडून इंजेक्शन घेऊन ती विकण्याच्या बदल्यात तीन हजार रुपयांचे कमिशन घेत होता. कमिशन पोटी त्याने घेतलेली रक्कम पोलिसांनी हस्तगत केली आहे.
गेल्या महिन्यात तालुका पोलिसांनी बनावट रेमडेसिविर इंजेक्शन तयार करुन ती विकणारी टोळी रंगेहाथ पकडली होती.पोलिसांनी त्यासाठी 'स्टिंग ऑपरेशन' राबविले होते. कोरोना संकट काळात रेमडेसिविरची मोठ्या प्रमाणात मागणी असताना या टोळीने पॅरासिटोमॉल गोळ्यांचे पाणी तयार करत ते कुपीत भरून विकण्याचा धंदा सुरु केला होता. ३० ते ३५ हजार रुपयांना एक इंजेक्शन विकले जात असल्याची माहिती पोलीस चौकशीत पुढे आली होती. या बनावट इंजेक्शनमुळे पवारवाडी (ता. फलटण) येथील स्वप्निल जाधव या कोरोनाबाधिताला आपला जीव गमवावा लागला होता.
या प्रकरणात काटेवाडीजवळील मासाळवाडी येथील दिलीप ज्ञानदेव गायकवाड याच्यासह प्रशांत घरत (रा. भवानीनगर), शंकर दादा भिसे (रा. काटेवाडी, ता. बारामती), संदीप संजय गायकवाड (रा. कसबा, बारामती), दयानंद उद्धव गोसावी व कृष्णा शशीराव जेवाडे (रा. जवाहरनगर, इंदापूर रोड, बारामती) यांच्यासह डॉ. स्वप्निल नरुटे व एका अल्पवयीन मुलाचा समावेश असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी या टोळीविरोधात यापूर्वी सदोष मनुष्यवधासह अन्य कलमांनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ————————————————